Kamalini

Kamalini Mulik

मी कमलिनी मधुकर मुळीक.पूर्वाश्रमीची माधुरी काशिनाथ राऊत.का.के.राऊत आणि शशिकला राऊत,वरोर यांची धाकटी कन्या.सद्या मी पालघर येथे रहाते. मी अर्थशास्र आणि राज्यशास्र या दोन्ही विषयात स्वतंत्रपणे पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे.व्यावसायीक अर्हता म्हणून बी.एड. केले आहे. सोनोपंत दांडेकर कनिष्ठ महाविद्यालयात अर्थशास्र विषयाची शिक्षिका म्हणून मी सात वर्षे काम केले आहे.त्यानंतर माध्यमिक विद्यालय ,भगिनी समाज,पालघर येथे दहा वर्ष मुख्याध्यापक म्हणून काम केले आहे. सन२०११ ते सन २०१४या काळात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण राज्यमंडळ पुणे येथे इ.१०वी व १२वी साठी राज्यशास्र विषयाकरीता अभ्यास मंडळ व लेखक मंडळ सदस्या म्हणून माझी निवड झाली.या काळात ज्ञानरचनावादावर आधारित अभ्यासक्रम तयार करणे व त्यानुसार पुस्तकांचे लेखन करण्याची संधी मला मिळाली.सद्या विद्यार्थी अभ्यासत असलेल्या नविन अभ्यासक्रमाच्या इ.१०वी व इ.१२वी च्या राज्यशास्र विषयाच्या पुस्तकांत माझे लेखन समाविष्ट आहे.आजतागायत विविध वृत्तपत्रात माझे लेखन प्रसिद्ध झाले आहे. माझे पती प्रा.मधुकर बाळकृष्ण मुळीक,सोनोपंत दांडेकर वरीष्ठ महाविद्यालयात अर्थशास्र विषयाचे प्राध्यापक आणि महाविद्यालयाचे उपप्राचार्य होते.सन २००९मध्ये ते निवृत्त झाले. आम्हाला दोन कन्या आहेत.मोठी मानसी विवाहीत आहे.तीला एक कन्या आहे.मानसी IdusInd Bank ltd मध्ये मुख्य व्यवस्थापक (Chief Manager-Government Banking Group)या पदावर कार्यरत आहे. धाकटी वैदेही शास्रीय संगीत गायिका आहे.मुंबईच्या रुईया महाविद्यालयातुन तीने गणित या विषयात पदवी संपादन केली आहे.ती गांधर्व महाविद्यालयाची संगीत विशारद असून शास्रीय संगीतात एस.एन.डी.टी.विद्यापीठाची एम.ए. आहे.तीचे आजवर अनेक ठीकाणी शास्रीय,उपशास्रीय आणि सुगम गायनाचे कार्यक्रम झाले आहेत.आजमितीला ३०विद्यार्थी तिच्याकडे शास्रीय,उपशास्रीय गायन आणि वादन शिकत आहेत.

माझ्या आठवणी-भाग-७

माझ्या आठवणी  भाग -७
कमलिनी मुळीक. (माधुरी काशिनाथ राऊत) पालघर.
दिनांक- १८ आॅगस्ट २०१७.
संपर्क- ९७६४९८५४९२.

माझे बाबा १९८०मधे शिक्षण विस्तार अधिकारी झाले. जवळजवळ वर्षभर भिवंडीतालुक्यात काम केल्यानंतर त्यांची पालघरच्या पंचायत समितीत बदली झाली. पालघर तालुक्यात खूप लांब लांबच्या शाळांच्या तपासणीसाठी बाबांना जावे लागे. बऱ्याच ठिकाणी वाहन जात नसे. तेथे बाबा चालत जात. काही ठिकाणी टेकड्या ओलांडून जावे लागे पण बाबा ठरवलेले काम वेळीच पूर्ण करत. कोणत्याही परिस्थितीत ते दिलेला शब्द पाळत.

बाबांच्या शाळातपासणीच्या वेळचा हा एक किस्सा आहे. पावसाळ्याचे दिवस होते. मनोरच्या पुढे कुठल्याशा शाळेत बाबांना शाळा तपासणीसाठी जायचे होते. मधे नदी की खाडी होती आणि तो नदीचा प्रवाह ओलांडून  पलिकडे  शाळा होती. त्यासाठी लहान होडीतून (तरीतुन) जावे लागे. मुसळधार पाऊस होता. तरीही बाबा गेलेच. बाबा होडीत बसले. बाबा शिक्षण विस्तार अधिकारी झाले तरी बाबांचा वेश लेंगा, शर्ट, टोपी असाच होता. त्यामुळे साहेबी पोशाखात बाबा नव्हते. त्या होडीत शाळेचे दोन तीन शिक्षक होते. त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या.

पहिला शिक्षक : 'काय हो, आज एवढा पाऊस, तरी शाळेत?'
दुसरा शिक्षक : 'काय करणार, नेमके इन्स्पेक्शन लावलय आज सायबान शाळेचे'.
तिसरा शिक्षक: 'कोणतरी नविन आलाय साहेब. फार कडक आहे म्हणतात.'
पहिला शिक्षक: कसला येतोय येव्हड्या पावसात तो सायब?
दुसरा शिक्षक: नाय रे ,तो सायब एकदा कळवलं का येतोच!
पहिला शिक्षक: अरे ,पण आज एवढ्या पावसात नाय यायचा बघ, थोड्या वेळानं होड्या पण बंद होतील!
दुसरा शिक्षक: अरे, तो फार शिस्तीचा हाय, होडी बंद झाली ना तरी पोहून येईल, पण इन्स्पेक्शन घेईलच!
बाबांच्याच शेजारी बसून हे सुरेल संभाषण रंगात आलं होतं. थोड्याच वेळात होडी किनार्‍याला लागली आणि सर्वजण उतरले. बाबांनी त्या शिक्षकांना पुढे जाऊ दिले आणि थोड्या वेळाने शाळेत गेले.
बाबांना पाहताच त्या शिक्षकांची तर  भंबेरीच उडाली. पण कसे बसे ,आपण त्या गावचेच नाहीत असे भासवत त्यांनी बाबांना विचारले, 'आज खूप पाऊस आहे, नदीला पाणी आहे, कसे आलात?'
बाबा म्हणाले, 'हं पाऊस आहे, नदी पण भरली आहे, पण मी पोहून आलो.'
त्या शिक्षकांना तर काय बोलावे हेच सुचेना. त्यांची पुरती बोबडीच वळाली. ते खूपच खजिल झाले. बाबांकडे माफी मागु लागले. बाबांनी सर्व सावरुन घेतले. कारण असल्या गोष्टींनी कामकाजावर परिणाम करुन घेणार्‍यातले बाबा नव्हते. बाबांनी सर्व तपासणी केली कामकाज व्यवस्थित होते. बाबांनी शेरा दिला. शेरा वाचून तर ते शिक्षक अधिकच गहिवरले. बाबांना म्हणाले, ' गुरुजी आम्ही होडीत तुमची टवाळी केली तरी तुम्ही आम्हाला चांगला शेरा दिला. ' बाबा म्हणाले, शेरा तुमच्या कामकाजासाठी आहे, होडीतल्या टवाळीसाठी नाही.' असे म्हणून बाबांनी त्यांच्या पाठीवर हात ठेऊन थोपटले. घरी आल्यावर मात्र बाबा, आईला आणि मला हा किस्सा सांगू लागले तेव्हा मी आणि आई अगदी  पोट धरुन हसलो.

 माझ्या बाबांचे नियमांच्या अधिन राहून काम  करणे अनेकांना अडचणीचे ठरे  आणि आपल्याला हव्या त्या सवलती मिळत नाहीत म्हणून बाबांना काहीवेळा त्रासही दिला जाई. असाच आणखी एक प्रसंग.

        तलासरीच्या शाळेत एक महिला शिक्षिका होत्या. त्यांचे पती पत्रकार होते. त्यांच्या तोंडी  नेहमीच , 'माझा नवरा पत्रकार आहे, मी बघुन घेईन' अशीच भाषा असे. त्यांचा नवरा पत्रकार असल्याने कसेही वागले तरी त्यांना कोणी जाब विचारता कामा नये असा त्यांचा समज होता. कायम  टेबलावर पाय ठेऊन  खुर्चीत बसायच्या. केव्हाही न कळवता रजा  रहायच्या आणि कारण विचारले की पत्रकार नवर्‍याचा वापर करायचा. पण नियमांचे काटेकोर पालन करणारे बाबा अशा धमक्यांना कधीच घाबरत नसत. त्यामुळे बाबांसमोर त्यांची डाळ शिजत नसे. त्या आमच्या घराच्या मागच्या बाजूलाच रहात. मधे फक्त कुडाची भिंत(?). त्यामुळे त्या घरी आल्यावरही आमचा उद्धार करीत. त्यांची मुले ही त्यांना साथ करीत. मोठ्ठ्या आवाजात रेडिओ लावणे, मोठ्यामोठ्याने बोलणे, कुडाच्या भितीवर जोराजोरात पाय आपटणे असे प्रकार त्यांच्या घरातून चालत. पण आम्ही कोणीच प्रत्युत्तर देत नसु.

एकदा तर कहरच झाला. बाईंच्या रजेवरुनच काहीतरी झाले (बहुदा नवरा घरी येणार म्हणून रजा हवी होती.)  बाईंच्या सर्व रजा उपभोगुन झाल्या होत्या. बाबांनी त्यांची रजा नाकारली. झाssले. बाईंनी  पत्रकार नवर्‍याचा डांगोरा पिटला आणि तरातरा वर्गात निघुन गेल्या. 

असेच चारपाच दिवस निघुन गेले. संध्याकाळचे साडेसात आठ वाजले असतील, आम्ही जेवायला बसलो होतो आणि अचानक डाक बंगल्यातुन एक शिपाई बाबांची चौकशी करत  आला, बाबांना म्हणाला , 'आत्ताच्या आत्ता डाकबंगल्यावर चला, मोठे साहेब आलेत आणि तुम्हाला ताबडतोब बोलावले आहे. बाबांनी त्याला दोन मिनीटे बसायला सांगीतले आणि कपडेकरुन त्याच्या बरोबर डाकबंगल्यावर गेले. बाबा गेल्यावर हर्षोल्हासाने कुडाच्या भिंतीपलीकडे  बाई मोठमठ्याने गाणी गाऊ लागल्या.
बाबा डाक बंगल्यावर पोहचले. डाकबंल्यावर आधीच पत्रकार नवरा हजर होता. बाबा गेल्यावर साहेबांनी पत्रकार नवर्‍याला बाहेर  पाठवले आणि बाबांना आत बोलावले, बाईंचा तक्रार अर्ज त्यांनी बाबांसमोर ठेवला आणि थोड्या कठोर आवाजात बाबांना विचारले, 'गुरुजी, तुम्हाला कल्पना आहे का तुम्ही काय करताय? त्यांचा नवरा पत्रकार आहे, तो काही करु शकतो तुमचे, माहित आहे का?'

बाबा हसले आणि अतीशय शांतपणे सर्व परीस्थिती त्यांना कथन केली आणि  साहेबांना म्हणाले, 'साहेब मी नियमांना बांधील  आहे आणि तुम्ही सांगीतले तरी नियम डावलून मी काही करणार नाही. जी परिस्थिती निर्माण होईल त्याला मी सामोरा जाईन.'  साहेब हसले, उठुन बाबांजवळ आले, बाबांच्या पाठीवर हात फिरवला आणि म्हणाले , 'गुरुजी मी तुमची परीक्षा घेत होतो, तुम्ही केलत ते अगदी योग्य केलं, कामचुकार माणसांना तुमची अडचण वाटणारच ,तुम्ही नियमांचे अगदी  योग्य आणि काटेकोर पालन करीत आहात त्यामुळे कोणाच्याही धमक्यांना भीक घालायची आवश्यकता नाही, आज तुमच्यासारख्यांचीच शिक्षण क्षेत्राला गरज आहे.' असे म्हणून तेवढ्या रात्रीही त्यांनी बाबांसाठी चहा मागवला. बाबा घरी आले.

थोड्यावेळाने बाईंचे गाणे 'टि.व्ही.त व्यत्यय' यावा तसे बंद झाले....आणि वर्षभरात त्यांनी  शाळाही बदलून घेतली!
             ———###——***——###———

Publish on your social media channel through the share buttons available on this page only.
Your Comment
Max 350 Characters | Login required to post comment

7 + 8=    get new code
Post Comment