Villages Villages वरोर

"जन्मभूमि वरोर"
अरबि समुद्र किनारा, तय गांवाया पसारा, वरोर मातृभुमी आमशी, वहली रामकाळी!
पुण्यभुमि ती पवित्र, प्रभु रामाया पदस्पर्श, मिरवी आज अभिमाने, तय शंखुद्वार!
सागरी दगडी काळा सेतु, बांधी राम कांही हेतु?
दाटलं आमसं कुतुहल, काळ्या पगारात!
सुंदर वाळुया किनारा, पश्चिम बाजुया तो साज, दक्षिण अणुवीज केंद्र, दिखे दिमाखात!
उत्तर अहे भयभीत, दडले सागर गर्भात, भावी वाढवण बंदर? भिती आम्हा मोठी!
पूर्वे चिंचणी तणाशी, वासगांव आणि ओसारवाडी, मंग दलदलीयी खाडी, पार वाणगांव!
गांवा बायेर एस.स्टी.स्टॅंड, मंग खाजणात पुल, आणुन होडी पावण्यांना, गांव ह्रदयात!
पयला हरिजन वाडा, मंग भंडार्‍यायी आळी, पाटलार्‍यायी पखाडी, मंग वाडीआळी!
मंग मांगेल्यायी आळी, तय होड्या आणि जाळी, देवकर वहती लांब तटे, त्यांशा टिघरे पाड्यात!
भैय्ये,मुसलमान अहती, त्यांशी गांवात कमी वहती, राजा आदिवासी वसे, तय पावळे पाड्यात!
तिन तलाव,दोन खाड्या, घणी हेतीस,थोड्या वाड्या, मोक्ष मिळे जकल्यांना, शांत मिरखाडीत!
डुंगा,भाटायी ती बाव, पाणी पेती रंक,राव, जीवन बावीयं ते पाणी, कव्वास नय आटलं!
अही भौगोलीक स्थिती, आता हांगतं काळी माती, पिकवी धन धान्य मोती, आमशा हिवारात!
मोड्ड,खारोट,गोजारी, बदाड,कटवाळी,केहराळी, वाळ,बद,पाही खारं, दूर जीवन वाडी!
वाल,गोवार वरोरशी, दुनिया साकी सव खाशी, मटण,कोंबडीया रस्सा, मंग वाटे फिका!
समाज रत्नायी ती खाण,
तय सेवेला नय वाण,
समाजरत्ने निपजली,
तय घरोघरी!
अहं संघायं नय पद, भुषवी नय वरोरकर, जकल्या जागी तो वावर, अहे सदा त्याया!
राऊत नानाजी व आ.ना., नातू पोर सुधिर जाणा, का.के. राऊत व अभि, पराग, परशुराम!
भुवनेश्वर, रजनिकांत, समाज सेवा अविश्रांत, आदी समाजायी सेवा, मंग घरदार!
पाटील पां.मा;ह.मा;ह.आं; वसंत पाटील,श्रीनिवास, जकले मानिती निवास, सो.पा.क्ष.स.संघ आपला!
शालिनि लक्ष्मण जोडी, त्यांना सेवेतस गोडी, आदी संसार संघाया, मंग केला आपला!
झाले विपुल लिखाण, कवि,लेखकायी खाण, अरविंद 'जीवन—गुंजी'कार, प्राज्ञ गुरु त्यांसा!
का.के.राऊत ते कवि, सुहास त्यांशी पिढी भावी, काव्य लेखनात त्याया, झरे रस शृंगार!
बंधु अरविंद,भुपेंद्र, बिपिन,हेमंत प्रज्ञावंत, सर नरेंद्र न हेमा, काव्य कथा त्यांशा!
शाहिर काशिनाथ विंदे, देवकर वसंत पाटील, सरपंच नानाजी न जन्या, भक्त श्रावण वनमाळी!
डुंगा,पिच्या,दत्तुबाई, शंकर बामण,येसुमायी, बाबुल्या,नारायण,नान्या, भारी बामण मंडळी!
बामण,मागेल्यायी पोरी, बामण,भंडार्‍यायी पोरी, बामण,वाडवळ कन्यका, जकले नांदले प्रेमानं!
गांव एक,आमदार दोन, आमशा गांवाहाटी ते होनं,
कपिल,विवेक गुरुपुत्र,
अहती सेवाव्रती!
जकला गांव भणला,सुज्ञ, कोणिस रेला नय अज्ञ, खंबाय मातेयं मंदिर, साई घेव्या हाय अवतार, जुने विठ्ठल मंदिर, आजशे पंढरपुर!
अहि गांवायी महती, शहरानं केली भानामती धांवते जकली तरुण पिढी, आवरुन संबुगबाळं!
ओस पडे गांव वहती, आय बाबा पोटी भिती, ताणली जकली नातीगोती, तुटतील रेतील दैव जाणी ते!
जकल्या गांवायास या कथा, कवड्या हांगु दु:खी व्यथा?
गांवात रेतील तीस खरी पण, धन्य धन्य मंडळी!

वरोर गावचे सुपुत्र आणि समाजबंधु श्री सुहास काशिनाथ राऊत यांनी रचलेल्या, वरील "वाडवळी" कवितेत वरोर गावाची महती सुंदरतेने वर्णन केली आहे.

वरोर, डहाणू तालुक्याच्या दक्षिण टोकाला समुद्रकिनारी वसलेला, निसर्गसौंदर्यतेने नटलेला एक सुंदर गाव. अत्यंत सुपीक जमीन लाभलेल्या या गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती. बरेचशे शेतकरी शेतीमधून बारमाही उत्पन्न घेतात. शेतीच्या जोडीला दुग्धव्यावसाय, ताडीव्यवसाय, डायमेकिंग, कुक्कुटपालन असे जोडधंदेही चालतात. गावातील बरेच युवक युवती रोजगारासाठी जवळच असलेल्या तारापूर एम आय डी सी या औद्योगिक परिसरात जातात. याचबरोबर गावातील प्रत्येक ज्ञातीतील लोक उदरनिर्वाहासाठी गावाबाहेर मुंबईपासून भारतात इतरत्र तसेच परदेशातही स्थायिक झाले आहेत. गावात आदिवासी, हरिजन, मांगेला, भंडारी, ब्राह्मण आणि वाडवळ असे वेगवेगळ्या जातीचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. साडेपाच हजारावर लोकसंख्या असलेल्या या गावात गेल्या शंभर वर्षांत जातिभेद, स्पृश्यास्पृश्यता, गरीब-श्रीमंत, जमीन जुमला असा कोणताही कलह, भेदभाव वा भांडणतंटा झाल्याचे ऐकिवात सुद्धा नाही. गावात अनेक आंतरजातीय विवाह संपन्न झाले असून, सर्वच कुटुंबे सलोख्याने नांदतात. याचेच बक्षीस म्हणून या गावाला १९५६ साली महाराष्ट्र शासनाने, "अस्पृश्यता निर्मूलनाचे प्रथम पारितोषिक" देऊन गौरविले आहे. याचबरोबर १९६८ साली जिल्हा पातळीवरील, "ग्रामगौरव" पुरस्कारानेही गावाला सन्मानित करण्यात आले आहे.

गावाच्या उन्नती आणि उत्कर्षा मध्ये समाज बंधू आणि भगिनींचाही मोठा हात आहे. समाज बंधू कै रामचंद्र विठ्ठल पाटील यांना वरोर गावचे प्रथम सरपंच पदाचा मान मिळाला होता, समाज बंधू श्री परशुराम पांडुरंग राऊत यांच्या प्रयत्नाने त्या काळात गावात पहिल्यांदा एसटी आली, व लोकांची खूप मोठी सोय झाली होती. समाजबंधू स्वर्गीय केशव कान्हा पाटील यांना पहिल्या महायुद्धात वीर मरण आले असून ते वरोरवासियांकरिता देशाप्रती स्फूर्तीस्थान आहेत, समाज भगिनी स्वर्गीय कुसुम काशिनाथ पाटील यांनी आपल्या वाट्याची आठ गुंठे जमीन गावातील शिक्षण संस्थेला विनामूल्य देऊन एक नवा आदर्श निर्माण केला. गावचे सुपुत्र श्री कपिल हरिश्चंद्र पाटील आणि श्री विवेक रघुनाथ पंडित यांनी अनुक्रमे विधान परिषदेत शिक्षक आमदार आणि विधानसभेत आमदार म्हणून आपले कर्तृत्व गाजविले आहे. पैकी श्री कपिल पाटील यांना २००७-२००८ साली उत्कृष्ट भाषण संसदपटू म्हणून महामहोदया श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले, याचबरोबर २०१६ सालाचा, "महाराष्ट्र आर्य चाणक्य महाराष्ट्र राज्य लोकप्रतिनिधी पुरस्कार" देऊन गौरविण्यात आले. शिक्षकांच्या अनेक प्रश्नांना श्री कपिल पाटील यांनी वाचा फोडली आहे.

वरोर गांवात वाडवळ समाजाचे अग्रणी नेते व कवि, लेखक, संपादक, चालनाकार पंचतत्व विलिन श्री अरविंद हरि राऊत यांचे आजोळी वास्तव्य होते, तो काळ त्यांनी त्यांच्या "जीवनगुंजी" या पुस्तकात शब्दबध्द करून वरोर गांवाला मराठी साहित्यात स्थान मिळवुन दिले आहे. कै. श्री हरिश्चंद्र आंगुजी पाटील, कै. श्री काशिनाथ केशव राऊत व सौ. वसुधा विजय पाटील यांना महाराष्ट्र राज्य सरकारने, "राज्य पातळीवरील शिक्षक पुरस्कार" देऊन गौरविले आहे. गावचे सुपुत्र श्री प्रीतम विजय पाटील यांनी आयआयटी पवई येथून माहिती आणि तंत्रज्ञान या विषयावर पीएचडी पूर्ण करून त्यावर ते आणखी संशोधन करीत आहेत, श्री प्रीतम पाटील हे १९८९ च्या शालांत परीक्षेत गुणवत्ता यादीतील विद्यार्थी आहेत. गावचे दुसरे एक सुपुत्र श्री निनाद भुवनेश्वर राऊत यांनी हिमाचल प्रदेशातील औषधी वनस्पतींवर संशोधन करून पीएचडी संपादित केली आहे. याच बरोबर गावातील अनेक बंधू-भगिनींनी वेगवेगळ्या सरकारी आस्थापनेत मोठमोठ्या हुद्द्यांवर कामे करून सरकारची, पर्यायाने देशाची सेवा बजावण्याचे कर्तव्य पार पाडले आहे.

गावाच्या उत्तरेला डहाणू थर्मल पॉवर स्टेशन, दक्षिणेला तारापूर अणुप्रकल्प आणि पश्चिमेला अरबी समुद्र आहे. समुद्रात दोन किलोमीटर अंतरावर शंखोदर हे नयनरम्य आणि धार्मिक ठिकाण आहे, प्रभू रामचंद्रांनी त्यांचे वडील राजा दशरथाचे पिंडदान करून या ठिकाणी श्राद्ध घातले होते असा उल्लेख पुराणात आढळतो. यामुळेच आजही अनेक लोक आपल्या स्वर्गीय नातेवाईकांचे पिंडदान करण्यासाठी दूरवरून या ठिकाणी येतात. वर्षातून एकदा अक्षय तृतीयेला ओहोटीच्या वेळी या ठिकाणावर असलेले लहान मंदिर समुद्राच्या पाण्यापासून मोकळे होते असे म्हणतात, परंतु माहितगाराशिवाय इथे जाऊ नये. या परिसरातील समुद्र खोलवर असून येथे शेवंड, कोळंबी, घोळ, दाढा या माशांच्या प्रजोत्पादनाचे ठिकाण आहे. सध्या याच भागात खोल समुद्रात वाढवण बंदर उभारण्याच्या सरकारच्या प्रयत्नांमुळे, पंचक्रोशीतील गावकरी आणि सरकार यांच्यात संघर्ष पेटला आहे.

गावातील लोक खूप धार्मिक आणि श्रद्धाळू, आणि गावची श्रद्धास्थाने आहेत विठ्ठल मंदिर आणि खंबाय माता मंदिर. गावाच्या मध्यावर असलेले विठ्ठल रखुमाई मंदिर आणि आषाढी एकादशीला होणाऱ्या सोहळा ही गावची मर्मस्थाने. गावाच्या उत्तरेला खंबाय मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार समाज बंधू श्री पराग परशुराम राऊत आणि श्रीआरुणी हरिश्चंद्र पाटील यांच्या प्रयत्नाने झाला असून तेथे भव्य मंदिर आणि सभामंडप उभारला आहे. याचबरोबर गावात, गावदेव कतोबा देवाचे मंदिर आहे, या देवाचे दर्शन घेतल्यानंतरच नवदाम्पत्य आपल्या घरी गृहप्रवेश करतात.

दिवंगत नेते समाज बंधू कै. लक्ष्मण पांडुरंग पाटील यांनी स्थापन केलेली प्रगती शिक्षण संस्था ही प्रगतीच्या शिखरावर असून, शाळेने मागील काही वर्षांत दहावीचा निकाल नव्वद ते शंभर टक्के लावून एक मापदंड घालून घेतला आहे, सध्या शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तरुण आणि धडाडीचे उद्योगपती श्री आरुणी हरिश्चंद्र पाटील सांभाळत आहेत.

गावाचा कारभार हा ग्रामपंचायती मार्फत चालविला जातो. काही काळापूर्वीच गावात सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याची सोय करण्यात आली आहे. गावात पोहोचण्यासाठी रोड, रेल्वे हे जवळचे मार्ग आहेत. हवाईमार्गे पोहोचायचे असल्यास, जवळचे विमानतळ आहे मुंबई. मुंबईपासून साधारणतः १३० किलोमीटर अंतरावर वरोर गाव आहे. जवळची रेल्वे स्टेशन आहेत, बोईसर, वाणगाव आणि डहाणू. तीनही रेल्वे स्टेशन वरून बस रिक्षा या साधनांद्वारे गावात जाता येते. गावात राहण्यासाठी लॉज किंवा हॉटेलची सोय नाही, मात्र आगाऊ सूचना दिल्यास चविष्ट घरगुती जेवण उपलब्ध होऊ शकते. पर्यटन स्थळाला आवश्यक स्वच्छ समुद्रकिनारा गावास लाभलेला असला तरी, पर्यंटनासाठीच्या प्राथमिक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे, नकाशावर पर्यटन स्थळ म्हणून उदय होण्यास वेळ लागेल, कदाचित गावाची सुंदरता अबाधित रहावी हेही ईश्वराच्या मनी असावे.

या लेखाच्या माहिती संकलनासाठी समाजबंधू श्री रजनीकांत मोरेश्वर राऊत आणि श्री अभिजीत प्रकाश राऊत यांच्याकडून मोलाची मदत झाली.