Achievers Achievers Politics

Hitendra Thakur

वसई-विरार ते पालघर, बोईसर, डहाणू परिक्षेत्रातील प्रत्येक घराघरामध्ये आपलेसे ठरलेले आपले ज्ञातिबंधू श्री. हितेंद्र ठाकूर यांचा जन्म ३ ऑक्टोंबर १९६१ रोजी विरार येथे झाला. त्यांचे मूळ गाव माहिम. व्यवसायानिमित्त त्यांचे वडील विरार येथे स्थायिक झाले. यामुळे हितेंद्र ठाकूर यांचे शिक्षण विरार व मुंबई येथे झाले. वयाच्या ३० व्या वर्षी ते राजकारणात सक्रीय झाले. आपला सुस्वभाव व जनहितदक्ष कार्यामुळे त्यांनी वसई विधानसभा मतदार संघात आगळा ठसा उमटविला आणि त्यांच्या प्रत्येक लोकाभिमुख कार्यात वसई तालुक्यातील जनता त्यांना साथ देत आली. यामुळेच ते खऱ्या अर्थाने 'लोकनेते' ठरले आहेत.


राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील दीड तपाहून अधिक काळ कार्यरत असलेले आप्पा अर्थात श्री. हितेंद्र ठाकूर हे वसई पालघर संघातून सतत चार वेळा महाराष्ट्र विधान सभेवर प्रचंड बहुमताने निवडून आले. त्यांच्या बहुआयामी व्यक्तीमत्वाची हीच खरी किमया व ओळख आहे.


कोणत्याही क्षेत्रात अन्यायाविरूद्ध प्रखर झुंज, निर्भय व निर्णायक लढा देणे हा त्यांचा स्थायिभाव असून अनेक लढे यशस्वी केले आहेत. तारापुर अणुशक्ती केंद्र व ठाणे जिल्हयातील जलाशयांवरील धरणे वगैरे विकास प्रकल्पामुळे विस्थापित झालेले शेतकरी, मच्छीमार, आदिवासीबांधव यांना त्यांनी योग्य न्याय मिळवून दिला. तसेच वैतरणा खाडीत उडी मारून रेती काढणारे व तारापुर-वसई औद्योगिक परिक्षेत्रातील कामगार यांच्यावर बेकारीची परिस्थिती आली असता अन्यायाविरूद्ध त्यांनी लढा दिला.


वसई क्षेत्रासाठी पुरेसा पाणी पुरवठा व्हावा म्हणून शासन दरबारी आपले वजन खर्च करून २.६७ कोटीची सुर्या पाणीपुरवठा करणारी योजना मंजुर करून घेतली. आपल्या मतदार क्षेत्रातील रस्त्यांचे रूंदीकरण, विद्युतिकरण, सुशोभिकरण, विज्ञान उद्यान परिक्रमा व नौका विहार बालोद्याने व क्रिडांगणे इ. सुविधा त्यांनी सहज उपलब्ध करून वसई-विरार भागाचा कायापालट करतानाच मतदार संघातील हिंदू, मुस्लिम, ख्रिचन व बौद्ध धर्मियांमध्ये जातीय सलोखा अबाधित ठेवण्याचे महान कार्य केले आहे.


प्रतिवर्षी साजरा होणारा "वसई कला क्रिडा महोत्सव" कोकण मराठी साहित्य संम्मेलन, ८२ वे मराठी नाट्य सम्मेलन, जागतिक मराठी परिषद यांचे उच्च दर्जाचे आयोजन व संयोजन तसेच वि.वा. ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यामातून माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाव़िद्यालये, महाविद्यालय तंत्रशिक्षण संस्था (पॉलिटेक्निक) यांची स्थापना करून वसई तालुका व इतर परिसरातील विद्यार्स्थाची उच्च व तंत्रशिक्षणाची झालेली सोय हा त्यांचा कार्याचा महामेरू बरोबरच विरार व वसई नगरपालिका व आताची वसई विरार शहर महानगरपालिका ही अपत्ये त्यांनीच निर्माण करून समृद्धावस्थेत आणली.


बृहन्मुंबई महानगरपालिका क्ष्रेत्र सोडून उर्वरीत प्रदेशाचा विकास अनुशेष भरून काढण्याचा मागणीचा पाठपुरावा, नागरी सहकारी बँकेच्या अर्थ साहाय्यातून एमयुटीपी व एमयुआयडी प्रकल्पाच्या धरतीवर वसई-विरार व ठाणे जिल्हा प्रदेशाच्या विकासासाठी सर्व समावेशक प्रकल्प हाती घेणे शासनाच्या अनेकविध योजना ठाणे जिल्हा परिसरात राबविणे या सारख्या कामाचे सातत्य राखत असताना कार्यक्षेत्र मर्यादित न ठेवता पक्षाची संपूर्ण ठाणे जिल्हयातील खेडोपाडी व गावागावातील बहुजनांपर्यंत पाळेमुळे पोहोचवून पूर्णत: सक्षम केले आहे.


स्वत:च्या कार्याचा आदर्श कार्यकर्त्यांपुढे ठेवून सर्वांशी मैत्रापुर्ण व निःस्पृह वर्तनाने परिसराच्या विकासासाठी झोकून देऊन अधिकाधिक लोकसेवा घडण्यासाठी त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभून, शैक्षणिक, सामाजिक जीवनात यश, समाधान व समृद्धी लाभो हीच कामना!