Achievers Achievers Sports

Pankaj thakur

श्री पंकज भास्कर ठाकूर यांचं नाव सध्या मुंबई क्रिकेट आणि भारतीय क्रिकेटमध्ये आदरानं घेतलं जाते. मागील बरीच वर्ष मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये कार्यकारणी सदस्य म्हणून काम केल्यानंतर यावेळी त्यांना उपाध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. राजकारणातून समाजकारण करण्याचं बाळकडू त्यांना मिळालं आहे ते त्यांचे वडील श्री. कै. भास्कर वामन ठाकूर यांच्याकडून. वडिलांप्रमाणेच सामाजिक बांधिलकी जपून समाजऋण फेडण्याचं महान कार्य त्यांच्या हातून घडत आहे. विरार नगरपालिकेत आणि सध्याच्या महानगरपालिकेत मागील ३० वर्षे सातत्याने नगरसेवक म्हणून निवडून येऊन अनेक समित्यांवर अध्यक्ष म्हणून त्यांनी भरीव कामगिरी केली आहे व सध्या स्थायी समिती सदस्य म्हणून जनसेवा करीत आहेत. विरार परिसरातील भक्तांचे श्रद्धास्थान आई जीवदानी मंदिराचे ते विश्वस्त आहेत. दर्शनासाठी लांबवरून येणाऱ्या भक्तांसाठी, जीवदानी आईचे दर्शन सुखकर व्हावे यासाठी खूप साऱ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.


श्री पंकज ठाकूर यांना लहानपणापासूनच क्रिकेटची प्रचंड आवड. कॉलेज जीवनात ते डाव्या हाताने उत्कृष्ट फलंदाजी करायचे. नेतृत्वगुणही त्यांच्यात ठासून भरलेले होते. परंतु त्यांच्या उमेदीच्या काळात अपुऱ्या सोयी सुविधांमुळे क्रीडा क्षेत्रात नैपुण्य दाखवण्यापासून त्यांना वंचीत राहावं लागलं. आपल्यासारख्या इतर गुणी खेळाडूंचे नुकसान होऊ नये, हा चंग मनाशी बांधून त्यांनी वसई-विरार क्षेत्रात खेळाडूंसाठी, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न सुरू केले.


श्री पंकज ठाकूर यांनी आपली खेळातील आवड जोपासण्यासाठी प्रत्यक्ष मैदानावर न उतरता पडद्यामागून भरघोस कामगिरी केली आहे. आपल्या भागातील खेळाडूंना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध व्हावीत म्हणून त्यांनी जीवदानी मैदान विरार, नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ विरार, यशवंत नगर विरार चिमाजी अप्पा ग्राउंड वसई, याचबरोबर पालघर परिसरातील खेळाडूंना सोयीचे व्हावे म्हणून अल्याळी गावात क्रिकेट मैदान विकसित करण्यास सर्वेतोपरी मदत केली, तसेच डहाणूपासून नालासोपारा-वसई पर्यंत अनेक ठिकाणी मैदाने विकसित करून, खेळाडूंसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या. क्रिकेटसारख्या खेळात नैपुण्य मिळविण्यासाठी आपल्या भागातील मुलांना लोकल प्रवास करून मुंबईला जावे लागते ही अडचण लक्षात घेऊन त्यांनी विरार येथे मागील पंधरा वर्षांपासून मुलांसाठी आणि मागील सात वर्षांपासून मुलींसाठी क्रिकेट कोचिंग क्लासेस सुरू केले. तसेच पालघर येथेही मागील पाच वर्षांपासून क्रिकेट कोचिंग क्लासेस सुरू केले आहेत. याचमुळे आजघडीला आपल्या भागातील अनेक गुणवान मुले व महिला देखील मुंबई तसेच भारतीय क्रिकेट मधे भरिव कामगिरी करताना दिसत आहेत.


स्पर्धात्मक क्रिकेट ला वाव मिळावा, मुलांमध्ये लहानपणापासून स्पर्धात्मक क्रिकेट रुजावं म्हणून त्यांनी मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या देखरेखीखाली इंटर कॉलेज आणि इंटर स्कुल स्पर्धा सुरू केल्या आहेत. तसेच मीरारोड ते डहाणू पर्यंतच्या निरनिराळ्या क्लबसाठी ४५ ओव्हरच्या आणि टी २० क्रिकेटच्या स्पर्धा भरविल्या जातात. पॅव्हेलिअन, जिम, स्विमिंग पूल आणि निरनिराळ्या आधुनिक सुविधांसाहित सुसज्ज अशी ग्राउंडस विरार वसई भागात भविष्यात विकसित करण्याचा त्यांचा मानस आहे. वसई-विरार भागातील अनेक क्रीडा संस्थांमध्ये ते वेगवेगळ्या पदांवर कार्यरत असून आपल्या अनुभवाचा फायदा संस्थांना, तसेच परिसरातील खेळाडूंना ते करून देत आहेत. भविष्यात त्यांच्या हातून क्रीडा क्षेत्रात अशीच भरीव कामगिरी होवो ह्याच शुभेच्छा.