Trust Editorial मा. श्रीकांत लक्ष्मण राऊत - आरोग्य सेवा निधी
24-Nov-2019

संकलक – तरंग जयप्रकाश पाटील, विरार 1113

सो.पा.क्ष.स. संघाच्या इतिहासात दि.२३ जानेवारी १९९६ हा दिवस सोनेरी पानात समाविष्ट करावा लागेल. समाजातील एका सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या दानशूर कुटुंबाने ह्या दिवशी अवघा रू. २६०००/- चा निधी समाजाकडे वर्ग केला. निधिचे नांव “आरोग्य सेवा निधी”. अशाप्रकारे एक दालन सुरु झाले असता त्याच कुटुंबातील श्रीकांत लक्ष्मण राऊत ह्यांनी रु. १०००/- चा निधी देवून वैद्यकिय सहाय्य निधीची स्थापना केली. दोन्ही निधी समाजाचे माजी अध्यक्ष पं. वि. लक्ष्मण माधव राऊत आणि त्यांच्या सुविद्य पत्नी माई लक्ष्मीबाई ह्यांच्या नांवे देण्यात आले. समाजातील दुर्बल अश्या समाजबंधुभगिनिंना वैद्यकिय उपचारासाठी आर्थिक सहाय्य करता यावे त्या द्रुष्टीने समाजाच्या शाखेशाखेत आरोग्य शिबिरे भरवणे हा निधी स्थापनेचा मुख्य उद्देश.

नांदगाव, नरपड, मधुकरनगर (२ वेळा), माहीम (२ वेळा), बोरिवली (३ वेळा) अशी आरोग्य शिबिरे आयोजित केली. ही शिबिरे सर्व ज्ञातितील व धर्मातील लोकांसाठी खुली करण्यात आली होती. अलिकडेच हे दोन्ही निधी एकत्रित करण्यात येवून एकच निधी झाला आहे. मानवतेच्या द्रुष्टीकोनातून माई लक्ष्मीबाई, पुत्र श्रीकांत, सूर्यकांत, चंद्रकांत ह्यांनी सुरु केलेल्या या महान कार्याला आजवर १५० च्या वर समाजबंधुभगिनिंनी हातभार लावल्यामुळे आज हा निधी रु. २६ लक्ष, ७१ हजार ९०२ इतका संकलीत झाला आहे. ह्या निधिच्या व्याजातून सन १९९८ सालापासून आजपर्यंत रु. १० लक्ष, ३० हजार, ५०० इतके अर्थसहाय्य समाजातील गरजू बंधुभगिनी तसेच बालकांना करण्यात आले आहे.

सध्या वैद्यकिय उपचार फारच महाग झाले आहेत. आपण करीत असलेली मदत फार तुटपुंजी आहे याची निधीदाते व समितीला खेद-जाणीव आहे. परंतु बुडत्याला काठीचा आधार ह्या प्रमाणे ह्या वैद्यकिय मदतीने गरजवंतांच्या मनाला उभारी येते. ह्या निधिचा उपयोग समाजातील दुर्बल घटकांना अधिकाधिक व्हावा यासाठी हा निधी वाढविण्याचा संकल्प आहे. पाण्याचा एक थेंब एकटा राहीला तर सुकून जातो, पण एकत्रीत थेंबाचा जलौघ होतो.

आपणांस आवाहन आहे की आपणही आपले माता-पिता, आजी-आजोबा किंवा इतर श्रद्धेय व्यक्तींची स्मृती चिरंतन रहावी म्हणुन त्यांच्या नांवे या वैद्यकिय सहाय्य निधीच्या महायज्ञात देणगीरुपी समिधा अर्पण कराव्यात, व आरोग्यं धनसंपदा ह्या उक्तीनुसार दुर्बल समाजघटकांच्या उपयोगी पडावे हीच मनोकामना.

ःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःः

आरोग्य सेवासमितीच्या वतीने श्रीकांत राऊत ह्यांनी दिलेल्या माहितीनुसार.