History History आपले वस्तिस्थान व व्यवसाय

उत्तर कोंकणात वसाहतीस आल्यानंतर निरनिराळ्या गावी आपला समाज पसरला. काही ठिकाणी नवी गांवेहि वसविली. पुष्कळ वर्षे हे वसणे अस्थीर होते. एक गांव सोडून दुसऱ्या गांवी जाणे सारखे चालत असे. आज ज्या गावांत आपला समाज आहे तेथील कित्येक कुटूंबे आपण कोणत्यातरी गावांतून येथे राहण्यास आल्याचे सांगतात. गावांत स्थीर झाल्यानंतर शेती, बागायती व सुतारकी हे धंदे आपल्या समाजाने स्वीकारले. चांगल्या सुपीक जमिनीसाठी, सग्यासोयऱ्यांच्या आधारासाठी किंवा राज्यक्रांतीमुळेंहि कांहिनी आपली पूर्वीची गावे बदलली असतील. त्याकाळी प्रत्येक गाव स्वयंपूर्ण होता. लोकांच्या गरजा थोड्या होत्या व त्या गावांतच भागत असत. गांवच्या कारभारात आपल्या समाजाला विशिष्ठ स्थान होते. कारण ज्या गांवी आपला समाज आहे त्या ठिकाणची पाटीलकी त्यांच्याकडेच आहे. पूर्वीचा पाटील हा जवळ जवळ गांवचा राजा असे. शिवाय गांवदेवी व होळी यांचा मानहि आपल्याच मंडळीकडे असे. आपल्या समाजात आज असलेली आडनावे पाहिली तर 'राऊत' व 'पाटील' हीच जास्त दिसतील. याचे कारण लष्कर व गांवकारभार यांतच अधिक भरणा आपल्या लोकांचा होता. पुरव, चौधरी, ठाकूर वगैरे आडनावे आपल्यांत कमी आहेत.

आजच्यापेक्षा अधिक गावे व कुटुंबे आपल्यात होती. ठाणे जिल्ह्यांतील गोरेगांव, नाळेसोपारे, बीरवाडी, अक्करपट्टी व गंभीरगड या गांवांतहि आपली वस्ती होती असे म्हणतात. त्याचप्रमाणे केळवे येथे 'माळी' आडनावाचे एक कुटुंब आपल्यांत होते. संघाच्या पहिल्या कालखंडात एका विधवा वृद्ध बाईस आडनावाच्या पुरूषांनी संघाची वर्गणी भरल्याची नोंद आहे. या घराण्यांतील एका विधवा कुटुंबप्रमुखसहि 'विठ्यामाळी' या नावाने संबोधले जात असे. काही कुटुंबाचा ऱ्हास झाला आसावा असे वाटते.

समाजातील स्त्रिया स्वावलंबी असून अत्यंत कष्टाळू होत्या. समाजाने पूर्ण शेतकरी पेशा पत्करल्यानंतर स्त्रियांनी त्यांत बरोबरीने भाग घेतला. शिवाय जोडधंदा म्हणून नारळाच्या सालापासून काथ्या तयार करून त्याची दोरखंडे तयार करण्याचे काम त्यांनी पत्करले. शेकडो वर्षे हे काम आपल्या समाजातील स्त्रिया करीत होत्या. यामुळे पतिनिधनांनंतर कोणतीही स्त्री पराधिन व परावलंबी राहीली नव्हती. त्याकाळी शिकलेल्या मुलींनाही खेड्यातून हेच बाळकडू मिळत असे. आज मात्र स्त्रियांना उपजिवीकेसाठी इतर व्यवसाय आधुनिक यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने करण्याचे शिक्षण जर मिळाले असते तर तो एक किफायतशीर घरगुती धंदा झाला असता. आपल्या समाजीतील स्त्रिया त्यात प्रवीण झाल्या असत्या.