Kamalini

Kamalini Mulik

मी कमलिनी मधुकर मुळीक.पूर्वाश्रमीची माधुरी काशिनाथ राऊत.का.के.राऊत आणि शशिकला राऊत,वरोर यांची धाकटी कन्या.सद्या मी पालघर येथे रहाते. मी अर्थशास्र आणि राज्यशास्र या दोन्ही विषयात स्वतंत्रपणे पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे.व्यावसायीक अर्हता म्हणून बी.एड. केले आहे. सोनोपंत दांडेकर कनिष्ठ महाविद्यालयात अर्थशास्र विषयाची शिक्षिका म्हणून मी सात वर्षे काम केले आहे.त्यानंतर माध्यमिक विद्यालय ,भगिनी समाज,पालघर येथे दहा वर्ष मुख्याध्यापक म्हणून काम केले आहे. सन२०११ ते सन २०१४या काळात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण राज्यमंडळ पुणे येथे इ.१०वी व १२वी साठी राज्यशास्र विषयाकरीता अभ्यास मंडळ व लेखक मंडळ सदस्या म्हणून माझी निवड झाली.या काळात ज्ञानरचनावादावर आधारित अभ्यासक्रम तयार करणे व त्यानुसार पुस्तकांचे लेखन करण्याची संधी मला मिळाली.सद्या विद्यार्थी अभ्यासत असलेल्या नविन अभ्यासक्रमाच्या इ.१०वी व इ.१२वी च्या राज्यशास्र विषयाच्या पुस्तकांत माझे लेखन समाविष्ट आहे.आजतागायत विविध वृत्तपत्रात माझे लेखन प्रसिद्ध झाले आहे. माझे पती प्रा.मधुकर बाळकृष्ण मुळीक,सोनोपंत दांडेकर वरीष्ठ महाविद्यालयात अर्थशास्र विषयाचे प्राध्यापक आणि महाविद्यालयाचे उपप्राचार्य होते.सन २००९मध्ये ते निवृत्त झाले. आम्हाला दोन कन्या आहेत.मोठी मानसी विवाहीत आहे.तीला एक कन्या आहे.मानसी IdusInd Bank ltd मध्ये मुख्य व्यवस्थापक (Chief Manager-Government Banking Group)या पदावर कार्यरत आहे. धाकटी वैदेही शास्रीय संगीत गायिका आहे.मुंबईच्या रुईया महाविद्यालयातुन तीने गणित या विषयात पदवी संपादन केली आहे.ती गांधर्व महाविद्यालयाची संगीत विशारद असून शास्रीय संगीतात एस.एन.डी.टी.विद्यापीठाची एम.ए. आहे.तीचे आजवर अनेक ठीकाणी शास्रीय,उपशास्रीय आणि सुगम गायनाचे कार्यक्रम झाले आहेत.आजमितीला ३०विद्यार्थी तिच्याकडे शास्रीय,उपशास्रीय गायन आणि वादन शिकत आहेत.

माझ्या आठवणी-भाग-६

1713

माझ्या आठवणी  भाग ६
कमलिनी मुळीक. (माधुरी राऊत)

पालघर.
दि.११आॅगस्ट २०१७.

तलासरीची तालुका स्कूल  ही  इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतची जिल्हा परिषदेची शाळा होती.तालुका स्कूल असले तरी फक्त एक शिपाई होता. क्लार्क वगैरे नाही. गंमत म्हणजे , बाबांचे नाव काशिनाथ केशव राऊत आणि शिपाई होते त्यांचेे नाव काशिनाथ गोपाळ राऊत. ते बेटेगावचे. आमच्या घरासमोरच्याच वसतीगृहाला लागुन असलेल्या एका खोलीत ते  आणि त्यांची मुलगी मीना रहात असत. बेटेगावला शेती असल्याने त्यांचे कुटुंब बेटगावलाच असे. तलासरीत सर्वजण बाबांना 'गुरुजी' आणि त्यांना 'काशिनाथ भाऊ' म्हणून हाक मारीत.

शाळेला क्लार्क नव्हता आणि तालुक्याच्या कामाचा व्यापही खूप मोठा. पगारवाटप, पुस्तके, वह्या, दगडीपाट्या, पेन्सिली  इत्यादींचे वाटप, असे सतत काहीना काही चालू असे. तेव्हा आजच्या सारखी जलद लिखाणाची बाकी कोणती साधने उपलब्ध नसल्याने त्या सर्व वाटपाचा हिशोब हातीच लिहावा लागे. त्यासाठी मोठे मोठे तक्ते आखणे, त्यात माहिती भरणे, शाळांनुसार साहित्यांचे गठ्ठे करणे, हे काम बाबा आणि काशिनाथभाऊच  करीत. क्लार्क नसला तरी बाबांनी काशिनाथभाऊंना सर्व  लिखापटीची कामे शिकविली होती. त्या मुळे शाळेत आणि घरी आल्यावरही जेव्हा बघावे तेव्हा बाबा आणि काशिनाथभाऊ दोघे लिखापटीच करताना दिसत.

मे आणि जून महिन्यात तर दोघांची धांदल उडे. संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांचे सर्व  साहित्य मे मधेच येत असे. मोठे मोठे ट्रक भरुन साहित्य यायचे. सुरक्षितता म्हणून हे सर्व साहित्य वसतीगृहातच उतरवले जाई. मे मधे वसतीगृह मोकळेच असे. सुट्टीअसल्याने विद्यार्थीही नसत. वसतीगृहाची जागाही मोठी होती आणि त्यामुळे बाबा व काशिनाथभाऊ यांना रात्रीही काम करणे शक्य होई. सर्वजण सुट्टीवर आणि बाबा व काशिनाथभाऊ दोघेही अक्षरशः रात्रीचा दिवस करीत. वसतीगृहात एका मोठ्या टेबलावर  मधे  कंदील  ठेऊन समोरासमोर बसलेले बाबा आणि काशिनाथ भाऊ मला अजूनही आठवतात. त्या दोघांच्याही चेहर्‍यावर मी कधी थकवा, कंटाळा पाहीला नाही. दोघेही कामाचा आनंद घेत .मधेच हास्य विनोद करीत. त्यामुळे कामाचा ताण त्यांच्या चेहर्‍यावर दिसत नसे. (अलिकडे काशिनाथभाऊंची तब्येत बरी नसल्याचे कळल्याने  दोन दिवसापूर्वी मी त्यांना भेटायला त्यांच्या घरी बेटेगावला गेले. बेचाळीस वर्षांनी मी त्यांना पुन्हा भेटले तरीही त्यांनी आणि वहिनींनी मला लगेच ओळखले. वहिनींनी तर मला मिठीच मारली.  आज ते ८५ वर्षाचे आहेत. बाबांच्या आठवणीने त्यांच्या डोळ्यात पाणी आले. मला म्हणाले 'बाबांबरोबर मी चौदा वर्षे काम केले , पण आमचे एक वेगळेच नाते निर्माण झाले होते. तुम्ही तलासरी सोडल्यानंतर, मी १९९० मधे निवृत्त होईपर्यंत पुढच्या चौदा वर्षात एकूण सोळा तालुका मास्तर  येउन गेले, पण  एकही टिकला नाही. कामातला रसच निघुन गेला '.)

बाबा आणि काशिनाथभाऊंच्या  कामाच्या या अशा पद्धतीमुळे शाळा सुरु होण्यापूर्वी सर्व शाळांच्या साहित्यांचे गठ्ठे बांधून तयार असत. त्या गठ्ठ्यांवर  शाळेच्या नावाच्या चिठ्ठ्या लावणे, पुस्तके वह्या मोजणे अशी कामे करुन मी पण खारीचा वाटा उचले. नव्या कोर्‍या पुस्तकातले धडे कविता मी तेव्हाच वाचून टाके. मला खूप मजा वाटायची. सर्व वह्यांवरील आणि पुस्तकांवरील चित्रे पाहताना माझी तहान भूक हरपून जाई. तेव्हाच्या बालभारतीच्या पुस्तकातील चित्रे 'ब्लॅक अॅंड व्हाइट ' असली तरी आजच्या पुस्तकातील चित्रांपेक्षा जास्त प्रभावी होती असे मला वाटते. उदाहरणच द्यायचे तर, 'लाडकी बाहुली' कवितेच्या पानावरील ती मुलगी, तीची ती डोळे उघडझाप करणारी बाहुली आणि नंतर पावसात भिजलेली व गाईने तुडवलेली ती बाहुली पाहुन मुलीची झालेली अवस्था दर्शविणारे चित्र किंवा 'घाल घाल पिंगा वार्‍या' मधली ती ओसरीत बसून वार्‍याशी गुज करणारी सासुरवाशिण ;  'श्रावण बाळ' कवितेच्या पानावरील श्रावणबाळाचे कावडीत बसलेले, तहानलेले आईबाबा, पाण्यात घागर बुडवित असताना झाडाआडून दशरथाने मारलेल्या बाणाने घायाळ झालेला श्रावणबाळ ;  'खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे'.. मधला मावळा आणि साध्या वेशात जनतेची परीक्षा घ्यायला निघालेले शिवाजी; 'गाई पाण्यावर काय म्हणूनी आल्या'.. मधले पोरकी नात आणि तिची समजूत काढणारे तिचे आजोबा' ; 'राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या' मधली ती चंद्रमौळी झोपडी आणि भूमीवर निवांत पहुडलेला म्हातारा; 'रंगरंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला 'मधला गवताच्या नाजुक फुलाला कुरवाळणारा तो मुलगा ...अशी जिवंत भाव प्रकट करणारी एक ना अनेक चित्रे मनावर असा विलक्षण प्रभाव टाकीत की तहान भूक न हरपली तरच नवल. (आजही केवळ कवितेची एखादी ओळ आठवली तरी प्रथम  चित्र आठवते आणि मग संपूर्ण कविता समोर दिसते. आजच्या चित्रात आणि कवितेतही ती ताकद नाही असे मला वाटते.) त्यामुळे बाबा आणि काशिनाथ भाऊ एकीकडे कामे करीत असताना  दुसरीकडे  दिवसभर  त्या पुस्तक, वह्या, पाटी  पेन्सिलींच्या ढीगात मी माझे बालपण अगदी मुक्त पणे जगत असे.

बाबा आणि काशिनाथ भाऊ सर्व कामे सुट्टीतच पूर्ण करीत असल्याने  शाळा सुरु होण्यापूर्वीच सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांच्या हाती साहित्य सूपूर्द केले जाई. आणि पहिल्या दिवसापासून मुले नवी पुस्तक, पाट्या वह्या घेऊन शिकत. बाबांनी  काशिनाथ भाऊंना लिखापटीच्या कामात घेतल्याने सहाजीकच वर्ग झाडणे, सारवणे, मुतार्‍या धुणे, घंटा देणे इत्यादी सर्व कामे आम्ही विद्यार्थीच करीत असू. इतर मुल वर्ग  झाडत. पंधरा दिवसातून एकदा वर्ग शेणाने सारवावे लागत. आमच्या वर्गात मुली फक्त आम्ही चौघीच होतो. आम्ही रस्त्यावरचे शेण आणायचो आणि मुले लाल माती आणि विहीरीवरुन पाणी आणून आम्हाला माती आणि शेण मस्त मिक्स करुन द्यायचे. त्या शेणाने आम्ही चौघी वर्गखोल्या सारवायचो. आमची प्रार्थना ओसरीवर होत असे. प्रार्थनेपूर्वी ओसरी झाडण्याचे काम मात्र  मी आणि काशिनाथभाऊंची मीनाच करीत असू. पहिली पासून ते सातवीपर्यंत , 'पर्मनंटली' ते काम बाबांनी  आमच्यावरच सोपवलेले होते.

या ओसरी झाडतानाचा एक प्रसंग मला आठवतोय. तेव्हा मी चौथीत होते. आमच्या शाळेत तीन शिक्षिका अाणि चारपाच शिक्षक होते. त्या दिवशी मी आणि मीनाने प्रार्थनेपूर्वी ओसरी झाडायला घेतली. पावसाळ्याचे दिवस होते. माझ्या उजव्या हाताच्या अंगठ्याचे नख कशामुळे तरी मुळातुनच निघाले होते. त्यामुळे तेथे जखम झाली होती. बाबा रोज शाळेत जायला निघण्यापूर्वी माझ्या बोटाला औषध लाऊन पट्टी बांधत. आम्ही नेहमीप्रमाणे  शाळेची ओसरी झाडायला सुरुवात केली, तेवढ्यात आमच्या वर्गशिक्षीका घाईघाईने आल्या. नेहमीप्रमाणेच उशीरा. त्यांच्या चपला चिखलाने पार बरबटल्या होत्या. त्यांनी पायरीवर चपला काढल्या आणि मला म्हणाल्या, 'माधुरी, तो झाडू ठेव बाजूला  आणि माझ्या चपला धुवून दे आधी !'  त्या वेळी शाळेत पाण्याचे  नळ वगैरे नव्हते . हातपंप होता आणि विहीर होती . तेथून पाणी आणावे लागे. पण ते पावसाळ्याचे दिवस होते. पाऊस पडत असल्याने पागोळ्यांच्या खाली मी बाईंच्या चपला धुवायला घेतल्या. मीना पण झाडू टाकून तेथेच ऊभी राहिली. (हा आमचा रोजचाच दिनक्रम होता. पाऊस नसला की विहीरीचे पाणी आणून आम्ही हा उपक्रम पार पाडत असू.) त्या गडबडीत शाळेची घंटा द्यायला आम्ही विसरलो. बाबांना प्रार्थनेची वेळ चुकविलेली अजिबात चालत नसे. प्रार्थनेची घंटा न दिल्याने ते लगेच आॅफीस बाहेर आले. बाबांचे आॅफीस पहिल्या वर्गात आणि आमचा वर्ग शेवटी होता. बाबा आले आणि  सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला. माझ्या हाताची मलमपट्टी मातीने माखली होती आणि पागोळ्यांखाली मी भिजलेही होते. बाबांना पाहून बाई लगबगीने खुर्चीतुन उठल्या. बाबांनी त्यांच्याकडे फक्त पाहिले. (बाबा  नजरेच्या भाषेनेच अनेक गोष्टी स्पष्ट करीत, त्यामुळे शब्द न वापरताही आवश्यक तो संदेश समोरच्यापर्यंत बरोब्बर पोहचत असे.) बाबा  मला कठोर शब्दात  म्हणाले, 'माधुरी , हातातले काम नंतर कर, प्रार्थनेला उशीर होतोय, आधी झाडून घे.'  तरीही मी घाईघाईत चप्पल धुतल्या आणि बाईंना नेऊन दिल्या.  आम्ही पटकन  ओसरी झाडून  घेतली व  घंटा दिली. प्रार्थना झाली आणि बाबांनी मला आॅफिस मधे बोलावले. माझ्याशी काहीही न बोलता त्यांनी माझी जखम धुतली , त्यावर लाल औषध लावले आणि मला वर्गात पाठवले. भिजलेले कपडे अंगावरच सुकले. पण या प्रसंगानंतर बाईंच्या चपला धुण्याची वेळ माझ्यावरच नव्हे तर इतर कुणावरही  कधी आली नाही........!

आम्ही तलासरी सोडल्यानंतर त्या बाईंची कधी भेट झाली नाही. पण ४-५ वर्षापूर्वी एका गावात एका शैक्षणिक कार्यक्रमात वक्ता म्हणून , 'नविन शैक्षणीक धोरण आणि ज्ञानरचनावाद '  या विषयावर व्याख्यान देण्यासाठी  मला बोलावले होते. त्या कार्यक्रमात गावातील ज्येष्ठ शिक्षकांचा सत्कार माझ्या हस्ते केला. तेव्हा त्या बाईंची आणि माझी  जवळजवळ चाळीस वर्षांनी भेट झाली. खूप गप्पा झाल्या. त्यानंतर सत्काराची वेळ आली. सत्कार करताना मी त्यांच्या अंगावर शाल पांघरली हातात श्रीफळ व पुष्पगुच्छ दिला आणि त्यांना वाकून नमस्कार केला, तेव्हा मात्र  चपलेचा तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोरुन  तरळून गेला....
                   —————*—————

Publish on your social media channel through the share buttons available on this page only.
Your Comment
Max 350 Characters | Login required to post comment

4 + 3=    get new code
Post Comment