Kamalini

Kamalini Mulik

मी कमलिनी मधुकर मुळीक.पूर्वाश्रमीची माधुरी काशिनाथ राऊत.का.के.राऊत आणि शशिकला राऊत,वरोर यांची धाकटी कन्या.सद्या मी पालघर येथे रहाते. मी अर्थशास्र आणि राज्यशास्र या दोन्ही विषयात स्वतंत्रपणे पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे.व्यावसायीक अर्हता म्हणून बी.एड. केले आहे. सोनोपंत दांडेकर कनिष्ठ महाविद्यालयात अर्थशास्र विषयाची शिक्षिका म्हणून मी सात वर्षे काम केले आहे.त्यानंतर माध्यमिक विद्यालय ,भगिनी समाज,पालघर येथे दहा वर्ष मुख्याध्यापक म्हणून काम केले आहे. सन२०११ ते सन २०१४या काळात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण राज्यमंडळ पुणे येथे इ.१०वी व १२वी साठी राज्यशास्र विषयाकरीता अभ्यास मंडळ व लेखक मंडळ सदस्या म्हणून माझी निवड झाली.या काळात ज्ञानरचनावादावर आधारित अभ्यासक्रम तयार करणे व त्यानुसार पुस्तकांचे लेखन करण्याची संधी मला मिळाली.सद्या विद्यार्थी अभ्यासत असलेल्या नविन अभ्यासक्रमाच्या इ.१०वी व इ.१२वी च्या राज्यशास्र विषयाच्या पुस्तकांत माझे लेखन समाविष्ट आहे.आजतागायत विविध वृत्तपत्रात माझे लेखन प्रसिद्ध झाले आहे. माझे पती प्रा.मधुकर बाळकृष्ण मुळीक,सोनोपंत दांडेकर वरीष्ठ महाविद्यालयात अर्थशास्र विषयाचे प्राध्यापक आणि महाविद्यालयाचे उपप्राचार्य होते.सन २००९मध्ये ते निवृत्त झाले. आम्हाला दोन कन्या आहेत.मोठी मानसी विवाहीत आहे.तीला एक कन्या आहे.मानसी IdusInd Bank ltd मध्ये मुख्य व्यवस्थापक (Chief Manager-Government Banking Group)या पदावर कार्यरत आहे. धाकटी वैदेही शास्रीय संगीत गायिका आहे.मुंबईच्या रुईया महाविद्यालयातुन तीने गणित या विषयात पदवी संपादन केली आहे.ती गांधर्व महाविद्यालयाची संगीत विशारद असून शास्रीय संगीतात एस.एन.डी.टी.विद्यापीठाची एम.ए. आहे.तीचे आजवर अनेक ठीकाणी शास्रीय,उपशास्रीय आणि सुगम गायनाचे कार्यक्रम झाले आहेत.आजमितीला ३०विद्यार्थी तिच्याकडे शास्रीय,उपशास्रीय गायन आणि वादन शिकत आहेत.

माझ्या आठवणी--भाग -१-माझी आई

1618

माझी आई! 

(भाग१)


         आज माझ्या आईचा जन्मदिवस. ११ मे २०१४ ला तिचे वयाच्या८२व्या वर्षी निधन झाले. आज तिच्या जन्मदिनी तिच्या सहवासातला प्रत्येक क्षण माझ्या मनासमोर तरळू लागला. वाटले की हा आठवणींचा पट तुमच्याशी शेअर करावा.
         ‌माझ्या आईबाबांचे मी सहावे अपत्य. शेंडेफळ! माझे बाबा प्राथमिक शिक्षक. आमची परिस्थिती अगदिच बेताची. माझ्या जन्माआधी तर दारिद्र्यच अनुभवलेले. म्हणजे माझी आई खूप दिवसात माहेरी आली नाही तर माझे आजोबा समजून जात आणि तिला  एक  नऊवारी लुगड घेऊन येत ते नेसून मग ती माहेरी जाई. ती कधीकाळीच घराबाहेर पडे. 
          आई  म्हणायची की माझ्या  जन्मानंतर आमची परिस्थिती बदलली.  एकतर बाबांची तालुका मास्तर म्हणून तलासरीला बदली झाली (जून १९६३)आणि बाबांचा पगारही ७५/- रूपये झाला. तलासरी हा आदिवासी बहुल तालुका. तालुक्याचे  ठिकाण असले तरी पूर्ण जंगलपट्टी. पण आईबाबा खूप सुखावले. पांढरा लेंगा ,लांब बाह्यांचा शर्ट आणि गांधी टोपी असा बाबांचा वेश. एकच जोड रोज धुवून वापरला तरी लक्षात येत नसे कुणाच्या आणि कितीही ठिगळ लावलेले लुगड नेसून आई सहज बाजारहाट करू शकत असे .
            अठराविश्व दारिद्र्य अनुभवत असलेल्या तेथल्या आदिवासी भागात आम्हाला आमच्या  गरीबीची तशी जाणिव होत नसे. पण एक प्रसंग असा घडला की आजही तो आठवला की मी खूप अस्वस्थ होते.माझे बाबा नास्तिक नव्हते पण तरिही व्रतवैकल्ये, पूजाअर्चा यावर त्यांचा विश्वास नव्हता. (त्यांच्या लग्नानंतर घातलेल्या सत्यनारायणाच्या पूजेला आई पदराला सुपारी बांधुन बसली होती) त्या मुळे आई उपवास करी पण कुठे पुजेला वगैरे जात नसे. सर्व बायका वटपौणिमेला वडाची पूजा करतात म्हणून मी एकदा आईकडे हट्ट केला आणि माझ्या हट्टाखातर ती तयार झाली. तलासरी हे तालुक्याच ठिकाण असल्याने विविध कार्यालयातील अधिकार्‍यांची कुटुंबे तेथे वास्तव्यास होती. त्यांच्या बायका दागिन्यांनी खूप नटून थटून हातात विविध फळांनी आणि पूजेच्या साहित्याने भरलेली ताटे(बहुतेक चांदीची)घेऊनआणि त्यावर विणलेला शोभिवंत रुमाल टाकुन, भरजरी साड्या नेसून पूजेला येत. माझ्या आईकडे ना दागदागिने होते ना भरजरी लुगडे ना चमचमते ताट आणि ना ताटावर टाकायला शोभिवंत रुमाल. गळ्यात काळ्या मण्यांची गरसोळी ,त्यात आतून लाख असलेले सोन्याच्या पातळ पापुद्र्याचे दोन मणी आणि मंगळसूत्राची वाटी , नेहमीचेच लुगडे आणि ताटात आमच्याच परसातील फुले आणि केळी. माझ्या हट्टाखातर ती आली आणि बायका आमच्या लक्षात येण्याइतपत कुजबुजल्या , 'गुरुजींची बायको बघा,लंकेची पार्वती..!' मी ५-६वर्षाची होते पण तरीही मला त्याचा अर्थ कळला. आईने कुणाशीही काही न बोलता पूजा केली. आम्ही घरी आलो. आईचे अश्रु ती माझ्या पासून लपवू शकली नाही . मात्र त्या नंतर ना ती कधी पूजेला गेली ना कधी हळदीकुंकवाला, ना कधी मी तिच्याकडे त्या साठी हट्ट धरला. पण ह्या एका प्रसंगाने गरीब आणि श्रीमंत यामधील दरी माझ्या मनावर कायमची कोरली गेली !

        ‌माझ्या लग्नानंतर माझ्या सासूचे मन मोडायचे नाही म्हणून पहिल्या वर्षीची वटपौर्णिमा आणि पहिली पाच वर्षे अगदी साधेपणाने हळदी कुंकू या गोष्टी केल्या. पण प्रत्येक वेळी हा प्रसंग मला अस्वस्थ करु लागला  आणि त्या नंतर आजतागायत मी या गोष्टींना पूर्ण विराम दिला.

 

- कमलिनी मुळीक
  पालघर
  दि. ८ जुलै २०१७

Publish on your social media channel through the share buttons available on this page only.
Narendra
Narendra Patil
06-Sep-2018 08:08 AM

माझ्या आठवणी १-६ भाग वाचून नाना नानिंच्या आठवणी दाटून आल्या . आपली हेमा ताई. वरोर - नारपड.

Your Comment
Max 350 Characters | Login required to post comment

4 + 9=    get new code
Post Comment