Kamalini

Kamalini Mulik

मी कमलिनी मधुकर मुळीक.पूर्वाश्रमीची माधुरी काशिनाथ राऊत.का.के.राऊत आणि शशिकला राऊत,वरोर यांची धाकटी कन्या.सद्या मी पालघर येथे रहाते. मी अर्थशास्र आणि राज्यशास्र या दोन्ही विषयात स्वतंत्रपणे पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे.व्यावसायीक अर्हता म्हणून बी.एड. केले आहे. सोनोपंत दांडेकर कनिष्ठ महाविद्यालयात अर्थशास्र विषयाची शिक्षिका म्हणून मी सात वर्षे काम केले आहे.त्यानंतर माध्यमिक विद्यालय ,भगिनी समाज,पालघर येथे दहा वर्ष मुख्याध्यापक म्हणून काम केले आहे. सन२०११ ते सन २०१४या काळात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण राज्यमंडळ पुणे येथे इ.१०वी व १२वी साठी राज्यशास्र विषयाकरीता अभ्यास मंडळ व लेखक मंडळ सदस्या म्हणून माझी निवड झाली.या काळात ज्ञानरचनावादावर आधारित अभ्यासक्रम तयार करणे व त्यानुसार पुस्तकांचे लेखन करण्याची संधी मला मिळाली.सद्या विद्यार्थी अभ्यासत असलेल्या नविन अभ्यासक्रमाच्या इ.१०वी व इ.१२वी च्या राज्यशास्र विषयाच्या पुस्तकांत माझे लेखन समाविष्ट आहे.आजतागायत विविध वृत्तपत्रात माझे लेखन प्रसिद्ध झाले आहे. माझे पती प्रा.मधुकर बाळकृष्ण मुळीक,सोनोपंत दांडेकर वरीष्ठ महाविद्यालयात अर्थशास्र विषयाचे प्राध्यापक आणि महाविद्यालयाचे उपप्राचार्य होते.सन २००९मध्ये ते निवृत्त झाले. आम्हाला दोन कन्या आहेत.मोठी मानसी विवाहीत आहे.तीला एक कन्या आहे.मानसी IdusInd Bank ltd मध्ये मुख्य व्यवस्थापक (Chief Manager-Government Banking Group)या पदावर कार्यरत आहे. धाकटी वैदेही शास्रीय संगीत गायिका आहे.मुंबईच्या रुईया महाविद्यालयातुन तीने गणित या विषयात पदवी संपादन केली आहे.ती गांधर्व महाविद्यालयाची संगीत विशारद असून शास्रीय संगीतात एस.एन.डी.टी.विद्यापीठाची एम.ए. आहे.तीचे आजवर अनेक ठीकाणी शास्रीय,उपशास्रीय आणि सुगम गायनाचे कार्यक्रम झाले आहेत.आजमितीला ३०विद्यार्थी तिच्याकडे शास्रीय,उपशास्रीय गायन आणि वादन शिकत आहेत.

माझ्या आठवणी--माझी आई,माझे बाबा...(भाग३)

1629

माझ्या आठवणी--
माझी आई ,माझे बाबा..(भाग३)


कमलिनी मुळीक.(माधुरी काशिनाथ राऊत)पालघर.
दि.२१जुलै २०१७.भ्रमणध्वनी ९७६४९८५४९२.

आषाढ अमावास्येवरुन आईबाबांशी निगडित  अशी आणखी एक आठवण माझ्या मनात जागी झाली.

तेव्हा तलासरीला चोर्‍यांचे प्रमाण फार होते.आमच्या वसतीगृहात तर दरवर्षी  लहान मोठी चोरी व्हायचीच. चोरीचा दिवसही आषाढी अमावास्येच्या आसपासचा असायचा. पण ह्या चोरीचा प्रसंग आजही  मला जसाच्या तसा आठवतो.

तलासरीचे आमचे घर बांबूच्या कुडाचे. वर नळ्यांची कौले. साधारण २०x२०चे घर. त्या मधे अर्ध्यावर  एक पार्टेशन . म्हणजे दोन खोल्यांचे घर. वसतीगृहही याच प्रकारचे. फक्त वसतीगृहाची जागा खूप मोठी साधारण ४०x४० ची अशी दोन घर. एक आमच्या घराला लागून आणि दुसरे अगदी समोर . मधे अंगण आणि बाजूला माझ्या आईची  परसबाग. वसतीगृहामुळे आम्हाला हे घर सरकारकडून मिळालेले. खाली सारवणाची जमीन. ती आठ पंधरा दिवसांनी शेणाने सारवावी लागे. बांबूचे कुडही वर्षातुन एकदा शेणमातीने लिंपावे लागत. लिंपताना मधे दोनतीन ठिकाणी चौकोन सोडायचे म्हणजे त्या खिडक्या. आणि बांबूच्या पट्ट्या उभ्या आडव्या बांधल्या की ते दरवाजे. दरवाजे लिंपलेले नसत. वायुविजन (ventilation) हवे म्हणून.

आमच्या घराला मागचा दरवाजा नव्हता. पण वसतीगृहांना मात्र मागचा पुढचा असे दोन्ही  दरवाजे होते. सर्व दरवाज्यांना कडी कोयंडे असले तरी माझे बाबा रोज रात्री झोपण्यापूर्वी  दरवाजाला आतून एक लाकडी वासा टेकू म्हणून लावत आणि वसतीगृहातील मुलांनीही दरवाजाला  टेकू लावले आहेत याची खात्री  करीत. बाहेरुन पण टेकू दिसत. बांबूच्या पट्ट्यांच्या दरवाज्यांच्या कड्या बाहेरुनही बोटाने सहज काढता येत. त्यामुळे माझ्या बाबांनी टेकू लावायची कल्पना शोधुन काढली होती. त्यामुळे कडी काढली तरी दरवाजा उघडता येत नसे.

वसतीगृहात ३० आदिवासी मुले होती. आमच्या घराला लागून असलेल्या वसतीगृहाच्या भागात महिन्याचा सर्व धान्यसाठा,तेल, मसाले आणि इतर वाणसामान असे. एका कोपर्‍यात आमच्या पाळलेल्या कोंबड्यांचे करंडे रात्रीच्या वेळी ठेवत असत. कोंबड्यांचे करंडे रोजच्या रोज साफ करुन त्यात राखाडी टाकून बाबा तयार ठेवीत. बाबांना वेळ नसला तर आम्ही कोणीही ते काम करीत असू. साधारण  ७-७.३०पर्यंत आमची सर्वांचीच रात्रीची  जेवणे होत. सर्वकामे आटोपून आम्ही ८-८.३०पर्यंत झोपी जात असू. माझी मोठी तिनही भावंडं मुंबईत रहात असल्याने, आम्ही शेवटची तिघे (विकास,अलका आणि मी) व आईबाबा असे पाच जण रहात होतो तलासरीला. विकास मुलांबरोबर आमच्या घराला लागून असलेल्या वसतीगृहात झोपत असे. त्याच्याबरोबर वसतीगृहाचा आचारी (त्याला सर्व जण महाराज म्हणत. तो गुजराती होता) झोपत असे. काही मुलं समोरच्या वसतीगृहात झोपत. मी ,अलका आणि आई बाबा आम्ही घरात झोपत असू. मीआईजवळच झोपत असे.

त्या दिवशी आषाढ अमावास्या होती. सर्वजण गाढ झोपेत होते. अचानक मला जाग आली आणि माझे लक्ष खिडकीकडे गेले.माझी आई खिडकीला सूप अडकऊन ठेवत असे , ते सूप हलत होते. मी आईला हलवून जागे केले आणि सूप हलत असल्याचे सांगितले. ती म्हणाली , 'ते वार्‍याने हलतेय ,तू झोप गुपचूप.' पण असे दोन तीन वेळा झाले. मी प्रत्येक वेळी आईला सूप हलतेय असे सांगत होते आणि आई मला गुपचूप झोपायला सांगत होती. शेवटी माझी सारखी कटकट ऐकुन तीने ते सूपच काढून टाकले आणि मी ही गुपचूप झोपले. सकाळी बाबा ऊठले आणि नेहमीप्रमाणे  वसतिगृहाच्या मुलांना उठविण्यासाठी गेले, तर वसतीगृहाचा दरवाजा उघडाच. बाहेर मातीचा ढिगारा, मोठमोठे  दगड  (डबर). आत डोकावून पाहतात तो मुले डाराडूर झोपलेली आणि चोरांनी वसतीगृहातील सर्वच धुवून नेलेले. बाबांनी वसतीगृहातील मुलांना हलवून जागे केले.आम्ही सर्वच जागे झालो. घडला प्रकार सगळ्यांच्या लक्षात आला. 30विद्यार्थ्यांचे महिन्याचे सर्व धान्य  ज्वारी ,गहू, तांदुळ, कडधान्ये, मसाले, तेल अगदी सर्वच साठवून ठेवलेल्या तांब्यापितळेच्या भांड्यासहीत चोरांनी नेले होते. माझ्या आईने पाळलेल्या 25-30 कोंबड्या, विकासच्या कपड्यांची पेटी, वसतीगृहाच्या आचार्‍याचे सर्व कपडे आणि आदल्याच दिवशी तो त्याच्या घरी वापीला जाऊन आला होता तेव्हा  त्याच्या बायकोने त्याला दिलेले गोडाधोडाचे  पदार्थ , सर्व चोरांनी नेले होते . त्याला तर घालायला कपडेही ऊरले नाहीत.

चोरांनी अतिशय हुशारीने चोरी केली होती. आषाढ अमावास्येपर्यंत बराचसा पाऊस पडुन गेलेला असतो.  त्यामुळे कुडाच्या घराच्या जमीनीलाही ओल येऊन जमीन भुसभुशीत झालेली असते.ते लक्षात घेऊन त्यांनी बाहेरुन आत येणारे भूयार खोदले होते. मऊ भुसभुशीत जमीनीमुळे खोदण्याचा आवाज अजिबात आला नाही. (कदाचित मधेच ते आमच्या घरात डोकाउन पहात असतील त्यामुळे खिडकीवरचे सूप हलत असावे. आईला माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केल्याचा नंतर पश्चाताप झाला असेल.) लहान 8-10 वर्षाचे मुल सहज आत जाऊ शकेल असे भुयार. लहान मुलाला आत पाठवून ,मग दरवाजाचे वासे काढून ,दरवाजे उघडलेले. एवढे सारे सामान नेले म्हणजे आठ दहा माणसे तरी नक्कीच असावीत. बाबा आणि वसतीगृहातील सर्व मुले, आई आणि आम्ही तिघे इकडे तिकडे काही खाणाखुणा आढळतात का ते शोधु लागलो.

इतक्यात आईने बाबांना हाक मारली. आमच्या परसबागेत तिला महाराजचे जेवणाचे डबे आणि पिशवी दिसली. आम्हा सर्वांचा मोर्चा परसबागेकडे वळला. महाराजच्या बायकोने त्याला दिलेले सर्व लाडु,परोठे,लोणचे मुरंबा यावर चोरांनी यथेच्छ ताव मारला होता. डबे मात्र व्यवस्थित बंद करुन ठेवले होते. मग आमच्यात  डिटेक्टिव्हगिरी संचारली. हातात मिळेल तशा लहान मोठ्या काठ्या घेउन आम्ही चोरांच्या पावलांच्या ठशाचा मागोवा घेत जंगलाच्या दिशेने निघालो. पुढे आई बाबा आणि मागे आमची फलटण. थोडे  चालल्यावर  एका मुलाने बाबांना हाक मारली, 'गुरुजीss तथ नांग आपल पिप हाय.' आमचा मोर्चा तेथे वळला . चोरांनी तांदुळ घेऊन   पितळी पिंप तेथेच टाकले  होतेे. बाबांनी एका बाजूला ते पिंप ठेवले आणि आम्ही पुढे जाऊ लागलो. एक दोन किमी चे जंगल आम्ही पिंजून काढले. पितळी पिंप , तांब्याचे हंडे, पितळी डबे, पत्र्याची रिकामी  पेटी, कोंबड्यांचे रिकामी करंडे असा सर्व मुख्य ऐवज मिळाला. चोर सोबत घेउन गेले ते फक्त  धान्य , डाळीकडधान्ये, मसाले तेल, कोंबड्या आणि कपडे.

‌शोधमोहिम संपवून आम्ही मिळालेले साहित्य घेऊन मागे आलो .भूयारापाशी ठेवलेले मोठाले दगड पाहुन मुले म्हणाली,'गुरुजी आपण जर कोणी त्यान्ला आडवतो ना तर त्यांनी यो धोंडा हाणला असता डोस्क्यात ! '  तेवढ्यात एका मुलाने हातात एक बोरुची 'T' आकाराची नळकांडी घेउन बाबांना म्हटले, 'गुरुजी,ये नांग ,या बोरुच्या नळकांड्या ,यात मेलेल्या जनावरांच आतड टाकून पेटवलं, आन घरभर फिरवल ना का झोपले सगळे सकाळपातुर.' एकेक मुलगा बाबांच्या ज्ञानात भर घालत होता. हे सारे होईपर्यत जेवणाची वेळ होत आली. महाराजने आणि आईने आमच्या घरातले डाळ तांदुळ वापरुन जेवण केले. आम्ही सर्व एकत्रच जेवलो.

शेजारीपाजारी बाबांना म्हणत होते पोलिसात तक्रार द्या. बाबांनी त्यावेळी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. दुपारच्या जेवणानंतर बाबांनी मोठ्या मुलांच्या मदतीने चोरीला गेलेल्या सामानाची यादी केली , किती रुपयांचे नुकसान झाले याचा हिशोब केला. आईने,महाराजला अंगात घालायला कपडे नव्हते , म्हणून मग बाबांसाठी आणलेल्या पायजम्याच्या कापडातून त्याला पायजमा शिवून दिला(तेव्हा आतासारखे तयार कपडे लगेच मिळत नसत आणि असले तरी ते घेण्याची ऐपत नसे). त्याच्या डोळ्यात अश्रू आले. आम्ही मात्र दुपारभर भूयारातून आत बाहेर करीत होतो.

संध्याकाळी आईबाबा बोलत बसले होते. त्यांनी पोलिसात तक्रार न करण्याचा निर्णय घेतला होता. मी म्हटले,'बाबा असे का?' तर बाबा म्हणाले,'खूप भूकेले असतील म्हणून चोरी केली त्यांनी, नाही तर  ते तांब्यापितळेची भांडी  सोडून गेले नसते.' बाबांनी पोलिसात तक्रार केली असती तर झालेले नुकसान सरकारकडून भरुन मिळाले  असते. पण ते चोर सापडले असते तर त्यांना बेदम मार खावा लागला असता. आईबाबांना ते नको होते. त्यापेक्षा त्यांनी स्वतः पतपेढीचे कर्ज काढून झालेले नुकसान भरुन काढण्याचा निर्णय घेतला होता. माझ्या आई बाबांनी आम्हाला कधीच ,अगदी बालवयातही, संस्काराच्या ,नीतीमत्तेच्या गोष्टी सांगितल्या नाहीत.पण त्यांच्या वर्तनातूनच खूप मोठी शिकवण आम्हाला नकळत मिळत गेली.........

Publish on your social media channel through the share buttons available on this page only.
Your Comment
Max 350 Characters | Login required to post comment

3 + 4=    get new code
Post Comment