Kamalini

Kamalini Mulik

मी कमलिनी मधुकर मुळीक.पूर्वाश्रमीची माधुरी काशिनाथ राऊत.का.के.राऊत आणि शशिकला राऊत,वरोर यांची धाकटी कन्या.सद्या मी पालघर येथे रहाते. मी अर्थशास्र आणि राज्यशास्र या दोन्ही विषयात स्वतंत्रपणे पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे.व्यावसायीक अर्हता म्हणून बी.एड. केले आहे. सोनोपंत दांडेकर कनिष्ठ महाविद्यालयात अर्थशास्र विषयाची शिक्षिका म्हणून मी सात वर्षे काम केले आहे.त्यानंतर माध्यमिक विद्यालय ,भगिनी समाज,पालघर येथे दहा वर्ष मुख्याध्यापक म्हणून काम केले आहे. सन२०११ ते सन २०१४या काळात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण राज्यमंडळ पुणे येथे इ.१०वी व १२वी साठी राज्यशास्र विषयाकरीता अभ्यास मंडळ व लेखक मंडळ सदस्या म्हणून माझी निवड झाली.या काळात ज्ञानरचनावादावर आधारित अभ्यासक्रम तयार करणे व त्यानुसार पुस्तकांचे लेखन करण्याची संधी मला मिळाली.सद्या विद्यार्थी अभ्यासत असलेल्या नविन अभ्यासक्रमाच्या इ.१०वी व इ.१२वी च्या राज्यशास्र विषयाच्या पुस्तकांत माझे लेखन समाविष्ट आहे.आजतागायत विविध वृत्तपत्रात माझे लेखन प्रसिद्ध झाले आहे. माझे पती प्रा.मधुकर बाळकृष्ण मुळीक,सोनोपंत दांडेकर वरीष्ठ महाविद्यालयात अर्थशास्र विषयाचे प्राध्यापक आणि महाविद्यालयाचे उपप्राचार्य होते.सन २००९मध्ये ते निवृत्त झाले. आम्हाला दोन कन्या आहेत.मोठी मानसी विवाहीत आहे.तीला एक कन्या आहे.मानसी IdusInd Bank ltd मध्ये मुख्य व्यवस्थापक (Chief Manager-Government Banking Group)या पदावर कार्यरत आहे. धाकटी वैदेही शास्रीय संगीत गायिका आहे.मुंबईच्या रुईया महाविद्यालयातुन तीने गणित या विषयात पदवी संपादन केली आहे.ती गांधर्व महाविद्यालयाची संगीत विशारद असून शास्रीय संगीतात एस.एन.डी.टी.विद्यापीठाची एम.ए. आहे.तीचे आजवर अनेक ठीकाणी शास्रीय,उपशास्रीय आणि सुगम गायनाचे कार्यक्रम झाले आहेत.आजमितीला ३०विद्यार्थी तिच्याकडे शास्रीय,उपशास्रीय गायन आणि वादन शिकत आहेत.

माझ्या आठवणी--माझी आई,माझे बाबा...(भाग-४)

1742

 

माझ्या आठवणी--
माझे बाबा..(भाग-४)

कमलिनी मुळीक. (माधुरी काशिनाथ राऊत) पालघर.
भ्रमणध्वनी ९७६४९८५४९२.
दि.२८ जुलै २०१७

आजचा भाग माझ्या बाबांविषयी. माझे बाबा प्राथमिक शिक्षक.पण त्यांच्या शिक्षकी पेशातला बराच मोठा कालखंड ते जिल्हा परिषदेच्या शाळांमधे मुख्याध्यापक आणि तालुका मास्तर म्हणून  काम करीत होते. वरोर, सातपाटी, निर्मळ, पिंपळशेत, बोर्डी, चिंचणी या ठिकाणी त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांचे मुख्याध्यापक म्हणून तर तलासरीला तालुका मास्तर म्हणून काम केले. पैकी सातपाटी आणि तलासरी येथे त्यांनी आपल्या नोकरीच्या कालखंडातला बराच मोठा काळ व्यतीत केला .जवळजवळ १२-१३ वर्षे सातपाटी येथे आणि १३ वर्षे तलासरीत. बाकीच्या ठिकाणी सहा महिने किंवा एखाद्या वर्षाचा काळ ते होते. १९८०साली त्यांना शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून बढती मिळाली आणि सुरुवातीला वर्षभर भिवंडी पंचायत समितीत आणि नंतर  पंचायत समिती , पालघर येथे  ते रूजू झाले आणि तेथूनच १९८४ मधे ते निवृत्त झाले.
       प्राथमिक शिक्षक ते शिक्षण विस्तार अधिकारी या त्यांच्या प्रवासात त्यांना आदर्श शिक्षक म्हणून शासनाचे सर्व पुरस्कार मिळाले. त्यावेळी पुरस्कार मिळविण्यासाठी स्वतःच अर्ज करण्याची पध्दत नव्हती. कुणीतरी नाव सुचवायचे आणि नंतर माहिती मागविली जायची.१९७१च्या जनगणनेत उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना राष्ट्रपतींचे रौप्य पदकही मिळाले. पण पुरस्कार वितरणाचा सरकारी सोहळा सोडला तर त्यांनी ना कुठे सोहळे केले ना कधी पार्ट्या. पुरस्कार वितरण सोहळ्याच्या आधीचे आणि नंतरचे सर्व दिवस आम्हाला नेहमी सारखेच वाटत. त्यामुळे आपल्या बाबांना एवढे पुरस्कार मिळाले तरी त्याचे जे अप्रूप असते ते आम्हाला कधी जाणवलेच नाही. आज जेव्हा असे पुरस्कार मिळविण्यासाठीची रस्सीखेच पाहतो तेव्हा आमच्या बाबांच मोठेपण आमच्या लक्षात येते.

माझ्या बाबांना मिळालेल्या पुरस्काराच्या प्रत्येक सोहळ्याला आई आणि मी सोबत जात असू. काही वेळा मोठ्या भावंडांपैकी कुणीतरी एकजण सोबत असे. पण माझा नंबर ठरलेलाच. माझ्या लग्नाआधीच्या वीस वर्षाच्या कालखंडातले मोजून आठ किंवा दहा दिवस सोडले ( ते ही बाबांची भिवंडीला बदली झाली , तेव्हा एक वर्ष बाबा तेथे भाड्याने घर घेऊन राहीले होते, ते घर नीट लावून देण्यासाठी आईला जावे लागले म्हणून) तर उर्वरित सर्व काळ मी माझ्या आईला कधीच सोडले नाही. त्यामुळे जेथे आई तेथे मी हे ठरलेलेच. त्यामुळेच माझ्या आईबाबांचा सर्वात जास्त सहवास मला लाभला.

‌मला नक्की आठवत नाही, पण १९७३-७४ वर्ष असावे. माझ्या बाबांना आदर्श शिक्षक म्हणून जिल्हा पुरस्कार जाहिर झाला. हा पुरस्कार वितरण सोहळा शहाडच्या विठ्ठल मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आला होता.

शहाड येथे जाण्यापूर्वी एकदिवस बाबा डहाणू येथे काही कामानिमित्त गेले होते. तेथून येताना कधी नव्हे ते आईसाठी दोन नऊवारी साड्या घेऊन आले. एकदम खुशीत त्यांनी आईच्या हातात साड्यांची पिशवी ठेवली. आईलाही एकदम गहिवरुन आले. तीने पिशवीतुन साड्या बाहेर काढल्या. नाजूक जरीची किनार असलेल्या मोरपंखी रंगाच्या एकातल्याच हूबेहुब दोन साड्या बाबांनी तब्बल नव्वद रुपये खर्चून आणल्या होत्या. कायम पांढर्‍या रंगाचा लेंगा, शर्ट, टोपी घालणार्‍या माझ्या बाबांना एकाच रंगाच्या दोन हुबेहूब साड्यांमुळे बायकोला काय फरक पडेल हे कसे कळणार? खूप निरागस होते ते. आईनेही जवळजवळ सात आठ वर्षे त्या साड्या आलटून पालटून नेसल्या. तिच्या दृष्टीने ती दोन वेगवेगळ्या साड्या नेसत होती पण जगाच्या दृष्टीने ती एकच साडी पुन्हापुन्हा नेसत होती. त्यातलीच एक साडी नेसून आम्ही शहाड येथील सोहळ्याला गेलो.

जिल्हा पुरस्कार मिळाल्या नंतर चार पाच वर्षांनी माझ्या बाबांचे नाव  राज्यपुरस्कारासाठी  विचारात घेतले गेले. शैक्षणिक क्षेत्रातील योगदाना बरोबरच बाबांचे सामाजिक कार्यातही मोलाचे योगदान होते. तसेच कै. श्रीम. अनुताई वाघ यांचे शिक्षण पत्रिका मासिक, रविवारची लोकसत्ता, आनंद मासिक, कुमार मासिक आणि इतर अनेक मासिके आणि वृत्तपत्रांमधुन ते मुलांसाठी लेखनही करीत. रविवारच्या लोकसत्तेतील 'किशोरकुंज'मधे त्यांच्या किशोरवयीन मुलांसाठीच्या अनेक कथा प्रसिध्द झाल्या होत्या. १९७१ च्या जनगणनेतील ऊत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपतींचे रौप्य पदक त्यांना मिळाले होते. १९७५ च्या आणीबाणी च्या काळातील सुरुवातीची कुटुंब नियोजन योजना आणि नंतरची कुटुंब कल्याण योजना तलासरीसारख्या भागात त्यांनी प्रभावीपणे राबविली होती या सर्व पार्श्वभूमीवर  कोणीतरी त्यांचे नाव राज्यपुरस्कारासाठी सुचविले होते. त्यानंतर  शिक्षणाधिकारी कार्यालयाने  बाबांना मुलाखतीसाठी बोलावणारे पत्र पाठवले. मात्र ते पत्र बाबांना मुलाखतीची तारीख उलटुन गेल्यावर तीन दिवसांनी मिळाले.

त्यावेळी ठाणे जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी मा. श्रीम. भार्गवे मॅडम होत्या. त्या खूप कडक आणि शिस्तप्रिय म्हणून ओळखल्या जात. त्यामुळे मुलाखतीची तारीख निघुन गेल्यानंतर तेथे मुलाखतीला जाणे बाबांना योग्य वाटेना. मात्र आईने बाबांना समजावले आणि बाबा जायला तयार झाले. दुसरेच दिवशी बाबा ठाण्याला गेले आणि भार्गवे मॅडमना वस्तुस्थिती सांगीतली. जवळजवळ साडेतीन तास मुलाखत घेतल्यानंतर त्या बाबांना म्हणाल्या की ,'गुरुजी ,हा पुरस्कार तुम्हाला यापूर्वीच मिळायला हवा होता.'

‌सन १९७९ मधे महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षकासाठीचा राज्यपुरस्कार बाबांना जाहिर झाला. रेडिओवरील बातम्या ऐकताना आम्हाला ते कळले. खूप आनंद झाला. हा पुरस्कार वितरण सोहळा सन१९८० च्या सप्टेंबर महिन्यात मुंबईत आयोजित करण्यात आला होता त्यावेळी मी एफ वाय. बी.ए.ला होते.

‌तीन दिवसांचा भरगच्च कार्यक्रम होता. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातुन एक असे तीस बत्तीस शिक्षक आणि त्यांचे कुटुंबीय मुंबईत आले होते. बरेच जण मुंबईत प्रथमच आले होते. प्रत्येक गोष्ट नविन होती. आमची तीन दिवसासाठीची निवास व्यवस्था मंत्रालयाजवळील, 'सारंग' इमारतीत १८ व्या मजल्यावर केली होती .नास्ता आणि जेवणाची व्यवस्था आमदार निवासात होती.
      
       पहिले दिवशी जेवणाच्या वेळी आम्ही आमदार निवासात आलो. तेथे मस्त सजावट केलेली होती. कधी न अनुभवलेला  असा जेवणाचा राजेशाही थाट होता. हे सारे पाहून आम्ही तर भांबावलो .जणू आम्ही तेथे, 'odd man out ' होतो. पण तरीही  आम्हाला खूप सन्मानाने जेवणाच्या टेबलाजवळ नेले. आम्ही तेथे जेवायला बसलो. पंचपक्वान्नांनी भरलेल्या ताटासमोर काचेचे मोठे ग्लास होते. त्यात त्रिकोणी घडी घातलेले कागद होते. त्या कागदाचे काय करायचे हे कुणालाच माहित नव्हते. पण प्रत्येक जण फजिती होऊ नये म्हणून एकमेकांकडे पहात होते. काहींनी कागद काढून बाजूला टाकले. मी ग्लासातून कागद काढला तेवढ्यात तेथे वेटर आला मी खूणेने त्याला विचारले तेव्हा तो मला हळूच म्हणाला कपड्यांवर अन्न सांडू नये म्हणून मांडीवर घ्यायचा तो कागद. मग आम्ही सर्वांनीच तसे केले.

‌दुसर्‍या दिवशी राज्यपालांबरोबर मेजवानी होती. सकाळीच दोन मोठ्या बस आम्हाला न्यायला येणार होत्या. आम्ही सर्व वेळेआधीच तयार होतो. पहिली बस फक्त पुरस्कार प्राप्त पती पत्नी यांच्यासाठीच होती. तशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या होत्या. दुसरी बस नंतर येणार होती. पण तरीही सर्वजण आपल्या नातेवाईकांसह पहिल्याच बस मधे बसले. नियमांचे आणि शिस्तीचे काटेकोर पालन करणार्‍या माझ्या बाबांनी मात्र मला दुसर्‍या बसने येण्यास सांगितले. आम्ही १०-१२जण दुसर्‍या बसची वाट पहात होतो पण बस आलीच नाही आणि राजभवनातील राज्यपालांबरोबरचा मेजवानीचा प्रसंग मला अनुभवता आला नाही. तो ही अनुभव अविस्मरणीय होता असे आईबाबा म्हणायचे.

मेजवानी आटोपून दुपारी सर्व परतले. तेथेही खूप थाटमाट होता. आता ग्लासातला कागद  मांडीवर ठेवायचा हे माहित झाले होते पण दुसराच फजितीचा प्रसंग उद्भवला. जेवणानंतर त्यांना वाटीत काहीतरी पाण्यासारखे दिलं. ते काय हे बहूतेकांना माहित नसावे. काहींनी चव घेऊनही पाहिले. पण ते विचित्र लागले. मद्य असावे समजून आईबाबांनी त्याला हातही लावला नाही. त्या वाटीत काय असेल असे माझ्या मनात बरेच वर्ष घोळत होते. (माझ्या लग्नानंतर काहीवर्षांनी माझ्या मुलींबरोबर हाॅटेल मधे जेवल्यानंतर जेव्हा लिंबाची फोड असलेली पाण्याची वाटी समोर आली तेव्हा मला आईने सांगितलेला राजभवनातील प्रसंग आठवला. ती विचित्र चवीची पाण्याची वाटी म्हणजे, ' फिंगर बाऊल' होता.)

दुसरे दिवशी  राजभवनात आयोजित केलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात राज्यपाल मा. सादिक अली यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. टि.व्ही वर ही या सोहळ्याची क्षणचित्रे दाखविली आणि आम्ही खूप सार्‍या आठवणी घेउन आपापल्या घरी परतलो.

Publish on your social media channel through the share buttons available on this page only.
Your Comment
Max 350 Characters | Login required to post comment

3 + 2=    get new code
Post Comment