Suhas

Suhas Raut

मी सुहास काशिनाथ राऊत,वयाच्या पासष्टीत आहे.वरोर,तालुका—डहाणु,जिल्हा—पालघर हे माझं गांव.वडील कै.श्री काशिनाथ केशव राऊत हे वरोरच्या वाडीआळीतील तर आई कै.सौ.शशिकला (पुर्वश्रमीची मनु पांडुरंग पाटील) ही पण वरोरच्याच पाटील आळीतील.०८ आक्टोबर १९५३ ला वरोरला आजोळी माझा जन्म झाला.आम्ही ३ भाऊ,३ बहिणी.माझा नंबर तिसरा.त्या वेळी "हम दो!हमारे दो!"चा नारा नव्हता.नाहीतर माझा तिसरा नंबर लागलाच नसता. वडील राज्य पुरस्कार प्राप्त प्राथमिक शिक्षक,नोकरीच्या अखेरच्या कालखंडात शिक्षण विस्तार अधिकारी होऊन सेवानिवृत्त झाले.आई गृहीणी.वडीलांना समाजसेवेचीही आवड होती.आम्ही सोमवंशी पाठारे क्षत्रिय ( वाडवळ) समाजातले.सदर समाजाचे अध्यक्षपदही वडीलांनी भुषविले.वडील अभ्यासात हुशार होते.पुर्वीच्या फायनल ( ईयत्ता ७ वीच्या) परीक्षेत ते ठाणे जिल्ह्यात प्रथम आले होते,तर प्राथमिक शिक्षकांच्या पी.टी.सी.(आताच्या डी.एड.समकक्ष) परीक्षेत ते महाराष्ट्रात प्रथम आले होते.त्यांना लेखनाची आवड होती.त्यांच्या २५० कथा,कविता,लेख,२५ नियतकालिकांतुन प्रसिध्द झालेल्या आहेत. मला लेखनाचा वारसा त्यांच्या कडुनच लाभला.वडीलांच्या नोकरी निमित्त आम्ही वरोर,निर्मळ,सातपाटी,तलासरी,बोर्डी,चिंचणी येथे राहिलो. माझे प्राथमिक शिक्षण वरोर व तलासरीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत,तर माध्यमिक शिक्षण ठक्करबाप्पा हायस्कुल,तलासरी व के.डी.हायस्कुल,चिंचणी येथे झाले.खासदार कै.श्री चिंतामण वनगा हे माझे वर्गमित्र,आम्ही तलासरीला ईयत्ता ५ वी ते ९ वी पर्यंत एका वर्गात शिकलो.एफ.वाय. व इंटर आर्टसला मी मुंबईच्या पार्ले काॅलेजला होतो. परिस्थितीवश नोकरी करणे भाग पडल्याने मी एप्रिल १९७४ ला महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात मिळालेली निम्नस्तर लिपिकाची पहिलीच नोकरी पकडली.पुढील शिक्षण बाहेरुन करण्यासाठी पुणे विद्यापीठ तसेच नाशिकच्या यशवंतराव चव्हाण विद्यापीठात प्रवेश घेतला पण संसार व नोकरी या मुळे बी.ए.होण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहिले. पेण,डहाणु,तलासरी,पालघर,बोईसर,वसई येथे ३७ वर्षे नोकरी करुन आॅक्टोबर २०११ ला ऊच्चस्तर लिपिक पदावरून सेवा निवृत्त झालो.सेवानिवृत्ती नंतरही ५ वर्षे जानेवारी २०१६ पर्यंत विद्युत मंडळात बाह्यश्रोत पध्दतीने काम करीत राहिलो.जुलै २०१६ पासुन एका सुरक्षा एजन्सीत काम करीत आहे.सध्या डहाणु पुर्वेला कॅनरा बॅंकेत आहे. वयाच्या बावीसाव्या वर्षी १४ आॅक्टोबर १९७५ ला नरपड, (दक्षिण आळी)तालुका—डहाणु,जिल्हा—पालघर येथील कु.कल्पना अरूण पाटील,त्या वेळचे वय वर्षे १६ हिच्याशी प्रेमविवाह झाला.एक मुलगा वय वर्षे ४१ व एक मुलगी वय वर्षे ३८ आहेत.दोघां कडुन वय वर्षे १३ व वय वर्षे ३ चे नातु आहेत. २५ वर्षे वाणगांवला वास्तव्य होते ११ वर्षांपासुन डहाणुला वास्तव्य आहे. वयाच्या १८ व्या वर्षी माझी पहिली कथा प्रसिध्द झाली.आज पर्यंत २५ नियतकालिकांतुन १०० च्या वर कथा,कविता,लेख व स्फुट लेखन प्रसिध्द झाले आहे. वाॅटसअप व फेसबुकवरही मराठी व बोलीभाषा वाडवळीत लेखन करतो.दिनांक २८ जानेवारी २०१८ ला सोमवंशी पाठारे क्षत्रिय समाजोन्नती संघ ट्रस्ट फंडाचा "सौ.जया लीलाधर चौधरी—पुरस्कृत लेखक/ कवी प्रोत्साहनपर गुणवंत गौरव पुरस्कार"मिळाला आहे. —सुहास काशिनाथ राऊत/ वरोरकर,डहाणु,09923004895.

"प्रसादाया मोदक!"एक वाडवळी कथालेख.

1921

 "प्रसादाया मोदक!"

     (१)

           जुन १९७० सा मयना.(जुनी) अकरावीयी परीक्षा पास होऊन आमी मुंबयशा विलेपार्ले (पूर्व) मनशा पार्ले काॅलेजात एफ.वाय.आर्टस ला प्रवेश घेतला.मी,माया भोटा भाहा (पण भाहापेक्षा मित्रस घणा) प्रकाश,वरोरसास भंडार्‍याया पोर किशोर,शिसणी देमणभाटारसा पाहेळा सुभाष सावे,शिसणीयास दांड्यानाक्यावरसा भंडार्‍याया जगदीश चौधरी अही आमशी पंचकढी.
           काॅलेज दुफारसं शार वाजता हुटव्यायं.एक दुहर्‍या वर्गात अहलेले आमी काॅलेज हुटल्यावर घरा जाव्याहाटी एकत्र जमव्याहे. एक दिही काॅलेज हुटल्यावर भंडार्‍याया किशोर त्याया वर्गाशा एका मित्राला घेऊन आला,आमाला अबिमानानं बोलला,
      "यो माया वर्गमित्र,कोण अहेन ओळखा बरं?"
     आमीन बुध्दीला ताण देऊन पावला पण आमाला निदान करणं अवघड होतं,तवा किशोर बोलला,
     "यो हाय सुप्रसिध्द लेखक, कादंबरीकार चिंतामणी त्र्यंबक खानोलकर उर्फ कवी आरती प्रभू यांसा पोर त्र्यंबक."
     अवड्या भोट्या माहणाया पोर!किशोरसा मित्र?किशोर माया पयली पासुनसा जिवश्य कंठश्य मित्र अहुनव मला किशोरसा हेवा वाटला.आमशी ओळख झाली तहा पयल्या दिहापासुनस त्र्यंबक आमसाव मित्र झाला न ती मैत्री गळ्यासा ताईत बनली.


(२)
           
     एक दिही काॅलेजशा व्हरांड्यात मी मराठी वाङमय मंडळाया बोर्ड निरखत होता.त्यावर त्र्यंबकशी एक कविता लावलोयी,
           "शब्दांची दुनिया!"
शब्दांच्या दुनियेत वावरणार्‍या अक्षरांना,
शब्दांचा अर्थ माहीत असतोच असे नाही,
म्हणूनच करत असतात ती सर्वस्व अर्पण,
भल्या बुर्‍या शब्दांसाठी!"

     अह्या त्या कवितेया पयल्या ओळी होत्या.
     तवड्यात तय त्र्यंबक न शार पोर्‍या आल्या, त्यायीन त्या मराठी वाङमय मंडळाया कास लावलेल्या बोर्ड वजा कपाटायं टाळे ऊघडलं न आपल्या हातामनशी लिवेली कागदं लावव्या सुरूवात केली.कागदं लाऊन टाळे लाऊन झाल्यावर मी त्र्यंबकला बोलला,
     "तुयी यी "शब्दांची दुनिया"कविता मस्त हाय.अभिनंदन!"
     "थॅंक्यू!"हांगत तो पुढे बोलला,"आताव आमी जे लावलंय त्यात आमसं बिजं लेखन हाय,तेव तू वासशिलस.""न हो तुला मी संपादक मंडळायी ओळख करून देतं,
     "ही शशीकला कुलकर्णी,मंडळायी संपादक न आपल्याला मराठी हिकवतात त्या श्री व.दि.कुलकर्णी सरांयी सुकन्या!"स्कर्ट ब्लाॅऊज घातलेल्या एक ऊसतांगड्या पोरीयातटे निर्देश करून तो मला बोलला.आमी दोगवाईन हातात हात घेऊन हालवले,एकमेकातटे पाऊन हाअले.
     "ही सुषमा तेंडूलकर,मंडळायी सेक्रेटरी न प्रसिध्द लेखक,नाटककार विजय तेंडूलकरांयी सुकन्या."परत हातात हात,परत ते हालवणं,परत एकमेकातटे पाऊन हाअणं.(सुप्रसिध्द नटी प्रिया तेंडूलकरशी बयीण.)
     "ही आशा कर्णिक,मंडळायी सबासद न सुप्रसिध्द लेखक मधु मंगेश कर्णिक यांशी सुकन्या!"त्यानं तिहरीयी ओळख करून दिली.ठेंगणी ठुसकी,श्यामल वर्ण,भारदस्त शरीरयष्टी,धारदार नाक,तिक्ष्ण डोळे,फॅशनेबल स्कर्ट ब्लाॅऊज परीधान केलेली,लिपस्टीक लावलेले ओठ मोहकपणे दुमडून मधाळ  लोभसवाणे हास्य फेंकून तिनं माये हात कवा हातात घेऊन हालवले तेस मला कळलं नय.तिन माये हात होडले तवा माया डोळ्यानं तिया तोकड्या स्कर्ट वरशी नजर होडली.
     "ही सुलभा."मंडळायी सबासद,त्यानं चौथीयी ओळख करून दिली.पेहराव स्कर्ट ब्लाॅऊज,जराशी जाडी,ठेंणणीस,अत्यंत विनयशील,साधा पण तेज:पुंज्य चेहरा त्यावर भोकराअवडे काळेभोर डोळे पण डाव्या हाताला दुसर्‍यांना जाणवण्या ईतपत कृशपणा.तिनं हाऊन नमस्कार केल्याहरकं केलं.मीनव हाऊन नमस्कार केला.
     "आणी यो हिरो सुहास राऊत"त्यानं मायी ओळख करताना हांगटलं,"योव कथा लिवतो,कविता करतो पण हांगतो,याया कथा ,कविता बेडरूममन जाऊन वासव्या लागतात,भगून कोणाला सोताहून दाखडे नय का वासव्या देय नय.अजून मलाव नय दाखडल्या"
     जकल्याजणी हाअल्या.
     मीव खजीलजहा झालो.
     "आमाला वासव्या दे आमी समिक्षकाया नजरेनं वासू.न शृंगार रस ते जकल्या रसांया राजा हाय!संस्कृतात कवडं शृंगारीक लिवेलं हाय!प्राध्यापक ना.सी.फडके शृंगारीक लिवतात,चंद्रकांत काकोडकर पण हात."शशीकला बोलली.त्र्यंबक न शारव्याजणी मनापासुन हाअल्या,त्यासन आशायं मादक हाअणं मात्र माया काळजात आजविरी  खोल रूतून रेलंय.


 (३)


     त्र्यंबक खानोलकरबोरबर मैत्रि झाल्यापासुनस त्याये बाबा साहित्त्यिक श्री चिंतामणी त्र्यंबक खानोलकर उर्फ कवी आरती प्रभू यांना याची देही याची डोळा पावव्यायी ईच्छा आमशा मनात घर करून होती.ती एके दिही फळाला आली.त्र्यंबकजून एक दिही आमाला त्याया घरा येव्याह आमंत्रण दिलं.आमसा आनंद गगनात नय मावला.
     गणपती हरले होते,मी,माहा मित्रवत भोटा भाहा प्रकाश,भंडार्‍याया किशोर,पाहेळा सुभाष सावे,भंडारी जगदिश चौधरी आमसं मित्रपंचक मालाड स्टेशनवर ऊतरलं.किशोर कवड्यावेळा तरी खानोलकरशा घरा जाऊन आलता,तो आमसा म्होरक्या.त्याया मंगारी आमी मालाड पूर्वेला सालव्या लागले.बरंस सालल्यावर आमी "स्मृति"नांवाया बिल्डिंग मेरे पोसलो,वर सडून खानोलकरांशा दारात ऊबे रेलो. किशोरजून घंटी दाबली,त्र्यंबकजुन दार ऊघडलं,आमस पंचक घरात खिरलं.
     पांडरा शुभ्र लेंगा न सदरा घालुन खुर्शिवर बहलेले साहित्त्यिक श्री चिं.त्र्यं.खानोलकर त्यांशा लेखनिकाला कायतरी मजकुर हांगतोये,आमी खानोलकरांना नमस्कार केला,त्यायीन आमाला बहव्या हांगटलं, आमी स्थानापन्न झालो.किशोरजून जकल्यायी ओळख करून दिली.
     चिं.त्र्यं.खानोलकर!जरासा कृश वाटणारा देह,किंचित जाडसर वाटणारा भिंगाया ससमा,कांहीसा त्रिकोनी वाटणारा चेहरा अहा सर्वसामान्य दिखणारा निगर्वी माहणू कवडा प्रतिभाशाली लेखक, कवी हाय ये पाऊन आमी स्तिमित झालो.
     थोड्या वेळानं रान्नीसन ताटात ढीगभर मोदक घेऊन नववारी निहलेली एक बाई बाहेर आली.किंचित ठेंगणी,काहीशी जाडसर अही ती, त्यांशी बायको होती,
जहा सादा तो महान लेखक तहीस सादी त्यायी बायकोव,अवडी सादीसुदी माहणं पण सरस्वती त्यांशा घरा पाणी भरतोयी.त्र्यंबकजून आयला जकल्यायी ओळख करून दिली.तिनंव हाआत हाआत जकल्यायी विशारपुस केली.
     मेरेस एक पोर बहलोया त्या तटे पाऊन त्र्यंबक बोलला, 
     "यो माया  बारका भाहा निवृत्ति."
     तो हाअला.हम्मोर जरा दुरस भितीला टेकून स्कर्ट ब्लाॅऊज घातलेल्या दोन पोर्‍या पाय दुमडून बहलोया त्र्यंबक बोलला,
     "या दोगव्या माया बयणी."
     त्यायीन हाअल्या हरकं करत ज्यास्तच माना खाली घातल्या. 
     "न ये जया दडकर, वडलांये लेखनिक."लेखनिकातटे पाऊन त्र्यंबकजून जकल्याया ओळखी पार पाडल्या.
     "सर्वांनी मोदक खा,खास कोंकणी सव हाय आमशी."लेखक खानोलकर बोलले न वातावरणात एकदम घरगुती पणा आला.आमी एकेक मोदक हुसलला,तोंडात घातला.खरंस अवीट गोडी होती त्यायी.
     "माया आईयी आठवण आली मला.अहेस बनवते ती मोदक!"मी बोललो.
     "त्र्यंबकशी आई,ती तुमशी सुध्दा आईह!"त्र्यंबकशे वडील बोलले.
    "भाई हा सुहास,कथा लिवतो,कविता करतो,नाटकात काम करव्यायीपण ईच्छा हाय यायी."त्र्यंबक बोलला.


 (४)


मला त्र्यंबकजून आदी हांगटल्याप्रमाणे मीन आणलेला माया प्रसिध्द झालेल्या पयल्या कथेया अंक त्यांशा मेरे दिला.अंकाय मुखपृष्ठ पाऊनस ते बोलले,
     "तारूण्यसुलभ शृंगारीक लेखन दिखते तुय.पण लेखनायी हुरवात अहीस अहते,पयलं लेखक जे अनुभवतो तेस लिवतो पण केवळ शृंगार मणजे जीवन नय,ती माहणायी प्राथमिक प्रवृत्ति हाय,पण या भावने मुळेस मानवी जीवन टिकून हाय,जग रहाटी सालु हाय.पण खरं जीवन मणजे कारूण्य, अश्रु,गरीबी,हालअपेष्टा.करूण रस योस खरा जीवन रस हाय कारण दुनियेमनशा जादातर लोकाना योस रस पेव्या मिळते.जीवनात हास्य पसरवणारे ओठ खाली अहतात पण आसवं गाळणारे डोळे त्याह्या वर बहतात.अर्थात लेखनात अवडी प्रगल्भता येव्याहाटी किही पांडरे होवव्या पायजेत पण पण आपली लेखन ऊर्मी तवविरी क्या ओगी रेव्याहाय?भगून आपण बक्कळ वासव्या पायजे,जकलं मराठी वाङमय वासुन काढ,इंग्रजीत ते अलिबाबायी गुहा हाय तियात खिर,जे दिखलं अक्षर ते वासून काड."अह हांगून त्यायीन तो कथेया अंक लेखनिक जया दडकर यांशामेरे दिला.दडकरायीन तो अंक त्यांशा बैठकीमेरे ठेवला न मला त्यांशामेरे अहलेली एक पुस्तकं भरलेली पिशवी दिली. 
     "माया जकल्या प्रसिध्द कथा,कादंबर्‍या,कविता,नाटकायी एक एक प्रत हाय यात,तुला ये जकलं भेट न तुला सुब्बेच्छा!"ते बोलले.
     " बिजी तुयी नाटकात जाव्यायी ईच्छा!तुया मेरे रंग रूप हाय पण ते केवळ दोनस घटक हात,अभिनय तुला दिग्दर्शक हिकवेन पण तपस्या तुयी पायजे.त्या हाटी पायजे घणा वेळ,सद्या तू विद्यार्थी दशेत हाय,दर वहरा पास होईल अवडा वेळ आदी अब्यासाला दे फावल्या वेळात लेखन ,नाटक कर,काॅलेजशा लेखन,नाटक मंडळात अब्यास हंबाळून भाग घे.डीग्री मिळवून नोकरी  मिळव न मंग जोपास जकले छंद!छंदापायी जीवनायं नाटक नको होऊन देवू न जीवनाया रंजक कादंबरीयी रडकथा नको होऊन देवू."
     बरास वेळ झालता,आमी ऊठलो जकल्याहा निरोप घेतला न अनुभवायी शिदोरी घेऊन त्यांशा घरा बायेर पडलो.


 (५)


     त्र्यंबकशा घरा परत जाव्याया योग नय आला पण त्याया वडीलाया न बिज्या नाटककाराया नव्या नाटकाये,साहित्त्यविषक कार्यक्रमाये जवा जवा फ्रि पास मिळत तवा तवा तो आमशा मित्र पंचकडीला आवर्जून बरोबर नेत अहे त्या मुळे दोन वहराया मुंबयशा काॅलेज जीवनात आमी गिरगांवसं साहित्त्य संघ मंदिर,प्रभादेवीयं रविंद्र नाट्य मंदिर,विलेपार्ल्यायं मास्टर दिनानाथ नाट्य मंदिर यात बरीस नाटकं न साहित्त्य विषयक अहे कवडेतरी कार्यक्रम फुकटात पावले न कवडे तरी लेखक,कवी,नाटककार,नट,नट्या,
दिग्दर्शक याना विंगेत जाऊन प्रत्यक्ष भेटलो,त्यांशा हातात हात मिळवले,त्यांशा सह्या गोळा केल्या.मुंबयशा दोन वहराया वास्तव्यात आमशी सांस्कृतिक भूक त्र्यंबकजून भागवली.
     अकराविला इंग्रजीत काठावर पास (३५/१००) होऊन काॅलेजला  पयल्या वहरा इंग्रजी माध्यम घेव्याया अट्टाहास,वर्सोव्याला पार्वती मावशीया   १५x१० या खोलीत स मयने न बोरीवलीला वझिरा व्हिलेजला प्रतिभाताईया १०x१० या खोलीत ७/७ माहणाबरोबर रेणं,जगदिश चौधरीया जितेंद्रया वेडापायी बक्कळ सिनेमे पावण,नाटक शिनेमात काम नय पण नट नट्या न शूटींग पावव्या हाटी मुंबयशे स्टूडीयो पालथे घालणं,प्रेमायी अडीस अक्षरं गिरवणं  या कार्यक्रमात मी आषाढीला नापास होऊन कार्तिकिला पास झाला,मंग इंटरस वहर,त्या काळी ईंटर पास झाला का काम फत्त्ते!पण ईंटर पास करव्या मणजे भारत पाक सीमा रेषा ओलांडव्या हरकं कठीण होतं.गेला ते हुटला नय ते हौतात्म्य पत्करव्याय. तयव माया हुतात्मा झाला,इंटरलाव कार्तिकियी वारी केली पण विद्यादेवी पावली नय,तवास मुंबय बायेर नोकरी मिळली न मुंबयला जाव्याये जकले मार्ग बंद झाले भगून मीन मुंबयला जाव्याया माया पासपोर्ट भाईंदरशा खाडीत ऊडून दिला.
     मैत्रियी पंचकडी तुटली,मित्रात संपर्क रेला नय.२६ एप्रिल १९७६ ला तलासरीला रेतोये तय रेडियोवर बातमी ऐकली कवी,लेखक,नाटककार चिं.त्र्यं.खानोलकर यांस वयाया ४६ व्या वहरा अकाली निधन.परीस्थितीनं त्र्यंबकला सांत्वनार्थ भेटव्याला जाणंव जमलं नय,एकदा वरोरला गेल्यावर किशोर भेटला,तो बोलला
     "सुहास फार भयानक बातमी हाय,आपला परम  मित्र त्र्यंबक खानोलकर आगीमध्ये जळून मेला!"
     ती बातमी मनाला जाळून गेली.
     सहा महिन्यात वरोरहून बातमी आली काविळ होऊन किशोर मेला.मन सुन्न झालं,एक परम मित्र कोवारास मेला.मन दुहर्‍यांदा होरपळलं.वहरं गेली तिहर्‍यांदा मनाला आग लागली परम मित्र सुभाष सावे मरून गेला.
     जगदिश चौधरीनं वरोरशीस आमशा घरामेरशीस पोरी केलाय,तो पालघरला रेते.माया मित्रवत भाहा प्रकाश  नायगांव ( वसई) ला रेते,मी १२ वहरांपासुन डहाणूला हाय.
     आता गणपतीला वरोरला प्रकाश ,मी,जगदीश हमखास भेटतो,
या जकल्या काॅलेजशा गोष्टी निंगतात,कोणीतरी प्रसादाया मोदक आमशा हातावर ठेवतो,मला त्या दोघाया हंगतीत खानोलकरशा घरा खाल्लेले मोदक आठवतात,माये डोळे पाण्यानं भरून येतात,मी प्रसादाया मोदक कोणशातरी हातावर ठेवतो,जगदीश,प्रकाश कारण विसारतात,त्र्यंबक,किशोर,सुभाषशा आठवणीनं त्यांशाव डोळ्याया कडा पाणावतात,अनपेक्षीतपणे त्यांशाव हातामनसा प्रसादाया मोदक दुहर्‍याया हातावर ठेवला जातो.
     अहा देवाया प्रसाद नाकारणं पाप हाय कां? देव त्यायं प्राय:चित्त आमाला देन कां? मी —६५, जगदीश—६६,प्रकाश —६७ अजून कवडी वहरं आमी अहा प्रसाद नाकारणार हात?


     शेवटसा प्रसाद कोण नाकारेल?
     जकलेस प्रश्न अनुत्तरीत हात!


***********समाप्त************

लेखन: श्री सुहास काशिनाथ राऊत/
           वरोरकर,
सी—१०,रामजीपार्क सोसायटी,इंटिग्रेट रोड,

डहाणुरोड (पुर्व)४०१ ६०२.
मो.०९९२३००४८९५.

Publish on your social media channel through the share buttons available on this page only.
Your Comment
Max 350 Characters | Login required to post comment

5 + 5=    get new code
Post Comment