Villages Villages घिवली

आमची घिवली किती छान समुद्र संपत्तीची खाण आमची घिवली किती छान वीज निर्मिती केंद्राचा लाभला तिला मान आमची घिवली किती छान

असे आमचे घिवली गांव, परंपरा प्रिय होते. गांवातील सर्व जातीतील, समाजातील लोक एकमेकांशी खेळीमेळीने वागून गुण्यागोविंदाने वागणारे होते. गावाचा न्याय गावांतील पंचामार्फत तोडगा काढीत होते. आपल्या परंपरागत शेतीला जोडून इतर पुरक व्यवसाय करीत असत. त्यात बागायती म्हणजे वाडी करीत असत. तसेच कोंबड्या पाळणे, गुरे पाळणे, नारळ्याच्या सालापासून गुंड्या तयार करून बाजारात जाऊन विकणे, मच्छिमार बोटीवरील मासे बैलगाडी व रेड्याच्या गाडीतून आणून त्यांचा मोबदला माशांच्या रूपात घेणे,ते मासे स्वतः विकणे इत्यादी. केंद्र सरकारने सन १९६२ साली आमच्या गावाच्या परिसरात आमच्या गावाची जमीन संपादन करून देशातील पहिल्या नंबरचा अणूवीज प्रकल्प उभारला. गाव प्रकल्प पिडीत झाले. त्यात काही घरातील मोजक्या लोकांनाच नोकऱ्या मिळाल्या. परंतु बऱ्याच लोकांची उत्पन्नाची साधने म्हणजे लघुउद्योग बुडाले. गावाचे हिरवळीचे निसर्ग सौंदर्य गेले. गावांतील घरे ओस पडली, गावातील लोक नोकरी धंद्यासाठी बाहेर गेले. गावाला अणुशक्ती केंदाचे पक्के कंपाऊंड आल्याने गावाचे गुरचरण, विहीरी, नाले, ओहोळ इत्यादी भूसंपादनात गेल्यामुळे गावातील गावकऱ्यांना दैनंदिन दिनक्रमात अडचणी आल्या. म्हणून लोक बाहेर गावी जाऊन राहिले.

अणूशक्ती केंद्र हे जरी घिवली गावालगत असले तरी त्याचे नांव तारापूर अणुशक्ती केंद्र असे आहे कारण आपले थोर अणूशास्त्रज्ञ डॉक्टर होमी भाभा यांचे आजोळ तारापूर असल्यामुळे त्यांनी घिवली व अक्करपट्टी मधील जागा शोधली, व प्रकल्प सुरू केला. घिवली गाव तारापूर पासून दोन किलोमीटर अंतरावर व अणूशक्ती केंद्रापासून अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. उत्तर पश्र्चिम दोन्ही बाजूला समुद्र किनारा आहे. समुद्राचे पाणी भरतीच्या वेळी गावामध्ये शिरते. गावाच्या दक्षिणेकडे अणूशक्ती केंद्र, बी.ए.आर्.सी.केंद्र व पूर्वेस उरलेली शेती आहे. गावाची लोकसंख्या अंदाजे ३५०० पर्यत आहे. आपल्या वाडवळ समाजाची ३० कटुंबं असून एकूण लोकसंख्या २६० आहे.

घिवली गावात मच्छिमार समाज बहुसंख्येने असून त्यापाठोपाठ भंडारी समाज आहे. तिसऱ्या स्थानी आपला समाज आहे. हरिजन, आदिवासी समाजही आहे. त्यांची संख्या कमी आहे. गावात जाण्यासाठी बोईसर व वाणगांव ही रेल्वे स्टेशन आहेत. तसेच बोईसर, तारापूर किंवा पाचमार्ग वरुन बसने किंवा रिक्षाने येता येते. समुद्र किनारा असल्यामुळे गावांचे हवामान उष्ण व दमट आहे.

गावात हनुमंताचे जुने मंदिर असून पाच वर्षांपूर्वी एका मोठ्या साईमंदिराची स्थापना करण्यात आली.गांवात दिवाळी सण विशेषतः बलीप्रतिपदेचा सण एकत्र येऊन साजरा करतात. गावात होळीचा सण सुध्दा एकत्र साजरा करतात. संपूर्ण गावातून फक्त दोन ठिकाणी होळी पेटवली जाते. हनुमंताची यात्रा हनुमान जयंतीला भरते. त्या दिवशी पालखी घरोघरी फिरविली जाते व लोक त्याची पूजा करतात.

गावाचा कारभार ग्रामपंचायत मार्फत केला जातो. गावात बालवाडी पासून सातवी पर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. गावात सरकारी दवाखान्याची सोय नाही, त्यासाठी लोकांना तारापूर, चिंचणी, बोईसर किंवा पालघर येथे यावे लागते. खाजगी डॉक्टर मर्यादित वेळेसाठी गावात येतात.

सो.पा.क्ष.संघ ट्रस्ट फंड स्थापनेपूर्वी समाजातील न्यायनिवाडा करण्यासाठी समिती नेमली होती त्यात घिवली गावचे एक सदस्य कै. दाजी गोविंद पाटील यांचा अंतर्भाव होता ही अभिमानाची गोष्ट. गावात १९२१, १९४६, १९६२, १९९० आणि २०१३ अशी एकूण पाच वार्षिक अधिवेशने संपन्न झाली आहेत. समाज कार्यात घिवली गावातील समाज कार्यकर्ते संघाच्या कार्यात सहभागी आहेत.