Villages Villages पंचाळी

सोमवंशी पाठारे क्षत्रिय समाजोन्नती संघाचे पंचाळी हे गाव बोईसर-पालघर या रस्त्यावर वसले आहे. गावात ग्रामपंचायत आहे. जांभूळपाडा, आगवन आणि पंचाळी मिळून एकच ग्रामपंचायत आहे. गावात वाडवळ, वैती, लोहार, आदिवासी समाजाचे लोक राहतात. गावाचे क्षेत्रफळ विस्तारीत आहे. जमिन लागवड क्षेत्रफळ १९३ हेक्टर असून गुरचरण जमीन ३५ हेक्टर आहे. गावची लोकसंख्या साधारणपणे १०००-१२०० असून त्यातील आपल्या समाजांचे ३५० पुरुष आणि २३५ स्त्रिया आहेत. गावचा मुख्य उद्योग शेती आहे. गावाजवळच ग्रामपंचायतीच्या मालकीची ६३० एकर खार जमीन असून त्यांवर "नादिरा सॉल्ट वर्क्स" नावाचे मिठागर आहे. पूर्वी गावातील मासळी प्रसिद्ध होती, परंतु एम्.आय्.डी.सी.च्या सांडपाण्याच्या प्रदुषणाने मासळीचे प्रमाण कमी झाले आहे.

गावातील प्रतिष्ठित सरपंच आणि उद्योजक कै. रामचंद्र अनंत ठाकूर यांचा डाईमेकींगचा व्यवसाय प्रसिद्ध आहे. आज त्यांच्या मागे त्यांच्या भावांनी हा व्यवसाय पुढे चालू ठेवला आहे. तिथे बरेच कामगार काम शिकून स्वत:चा व्यवसाय करु लागले आहेत. गावात संगणक प्रशिक्षण देणारी एक कार्यशाळा गौरव पाटील या युवकांने चालू केली आहे. तसेच अंगणवाडी, बालवाडी, इ. १ली ते ७वी पर्यंत शाळा असून एक इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. गावात पुरातन पोर्तुगीज किल्ला असून तो भग्नावस्थेत आहे. ग्रामपंचायत कार्यालय, श्री.राम नाईक यांनी बांधलेले समाज मंदिर, गणपती देवालय व भवानी माता मंदिर गांवात आहेत. गणपती उत्सव माघ महिन्यात होतो, तसेच भवानी मातेचा वर्षांतून दोन वेळा हबनांदी कार्यक्रम होतो.

पंचाळी गाव हे सांस्कृतिक गाव आहे. येथील उत्सव तन्मयतेने व भक्तीने साजरे केले जातात. गोकुळ अष्टमी हा उत्सव पंचाळी गांवात अगदी उत्साहात साजरा केला जातो. भजन, गायन तसेच टाळ मृदंगाच्या साथीने ताल धरून गोकुळ अष्टमी साजरी केली जाते. या गावातील बुजुर्ग मंडळींतही वारकरी पंथांचे असलेले कै. अनंत गोपाळ ठाकूर, त्यांचे सुपूत्र कै. रामचंद्र अ.ठाकूर आणि त्यांचा परिवार यांनी भक्तिरस जागविला. गांवात आजही गणपती, गोकुळ अष्टमी, दिवाळी आणि होळी हे सण एकत्र साजरे केले जातात.

गावातील लोकांना खेळाचीही आवड आहे. गावात प्रतिवर्षी क्रिकेटच्या स्पर्धा भरविल्या जातात. हॉलीबॉल हा खेळ देखील सातत्याने खेळला जातो. कब्बडीत मुले अग्रेसर आहेत. गावातील तरुणाई ही खाणीतील रत्ने आहेत. त्यांत काही मुले इंजिनिअर, डॉक्टर, उच्च पदस्थ आहेत. कु. दर्शन पुरुषोत्तम पाटील हा तरुण इंदूर विद्यापीठांतून I.I.T. ही उच्च पदवी घेऊन राष्ट्रपती पदकाचा मानकरी ठरला आहे. श्री. बिनीना ही भरत गणपत राऊत या़ंची मुलगी M.B.B.S.,M.D.,DHS अशी डॉक्टरी पदवी घेऊन कार्यरत आहे. तसेच मुलगा M.B.A. इंजिनियर करून चीन मध्ये आहे. श्री. नागेश ठाकूर यांचा मुलगा आणि श्री. प्रतिम कुंदन पाटील हे दोघं इंजिनिअर म्हणून अमेरिकेत आहेत.

गावातील काही मुले वीटधंद्यात आणि इमारत बांधणी व्यवसायात आहेत. सो.पा.क्ष.स. संघाच्या घडणीमध्ये आमच्या शाखेचा आर्थिक दृष्ट्या सहभाग आहे. गावाला तंटामुक्तीचा पुरस्कार मिळाला आहे. तसेच गावातील सहकारी सोसायटीसही शंभर टक्के कर्ज वसुली झाल्याचा प्रशासकीय पुरस्कार मिळाला आहे. गावातील निवृत्त झालेल्या पैकी बरेचसे लोक हे मोठमोठ्या क्षेत्रातून निवृत्त झालेले आहेत. त्यात बॅंका, शिक्षणश्रेत्र, अणुशक्ती खाते, पोस्ट ऑफीस, टेलिफोन, रेल्वे इत्यादी सरकारी खात्यातून निवृत्त झालेले आहेत.

पर्यटनाच्या बाबतीत आमच्या कडे कुठलेही प्रेक्षणीय स्थळ नाही, ज्यामुळे आम्ही त्याची कास धरू, परंतु मीठ कसे पिकविले जाते त्यांचे उत्तम उदाहरण म्हणजे आमचा "नादीरा सॉल्ट वर्क्स" हा उद्योग. बाकी आदरतिथ्यच्या बाबतीत आमचे गाव सदैव तत्पर असेल एवढे मात्र खरे.