Trust Community स्थापना

संघस्थापने पूर्वीची सामाजिक स्थिती

प्रत्येक गावात ज्ञातिपंचायती असत. परंतु सर्व समाजाच्या वतीने निर्णय घेणारी मध्यवर्ती संस्था नव्हती. एखाद्या ग्रामज्ञातिपंचायतीने गावातील एखाद्या ज्ञातीय प्रकरणा बद्दल निर्णय घ्यावा व मग तो गावोगावच्या पंचमंडळींना कळवावा अशी रीत होती. बहुतेक एका गावाने कळविलेला निर्णय दुसरा गाव पाळीत असे. क्वचित निर्णय न पाळणारा गांवहि निघत असे. ज्या गावाने आपला निर्णय पाळला नाही त्या गांवचे नांव लक्षात राही व ज्या वेळी त्या गांवाकडून अमंजबजावणी साठी निर्णय येई त्यावेळी त्याची त्याला आठवण दिली जात असे. कधीं कधीं तो निर्णय अमान्य करून पूर्वीचा सुडहि उगविला जाई. एकंदरीत सामाजिक सबंधात एकसूत्रीपणा असा नव्हताच.

संघाची स्थापना

तो काळ राजकीय व सामाजिक चळवळीचा होता. वंगभंगाची चळवळ देशभर पसरली होती. केसरीव्दारे लो. टिळकांनी राजकीय आकांक्षाचे लोण महाराष्ट्रांत खेडोपाडी पोहोचविले होते. आर्यसमाज, सेवासदन, सत्यशोधक समाज वगैरे सामाजिके संस्था निर्माण होऊन मुंबईसारख्या ठिकाणी त्यांचे कार्य दिसूं लागले हेाते. या सर्व चळचळीचा शिरकाव आपल्या समाजांत जरी झाला नाही तरी ते वारे समाजावरून गेल्याशिवाय राहिले नाही. आपला समाज मुंबईजवळ असल्यामुळेव मुंबईतहि काही वस्ती असल्यामुळे या देशव्यापी आंदोलनाचा सहाजिकच परिणाम होऊन आपण संघटित झाले पाहिजे, आपली सुधारणा झाली पाहिजे, ब्राम्हणदि सुधारलेल्या समाजाच्या बरोबरीस आले पाहिजे असे त्यांस वाटू लागले. यासाठी आधी कोणी प्रयत्न केला हे माहित नसले तरी इ.स. १९०८ सालापासून या बाबतींत समाजातील मुंबईह काही गांवचे पुढारी एकत्र येत व एक मध्यवर्ति संस्था स्थापण्याचा बेत करीत, हे उपलब्ध कागदपत्रावरून दिसून येते.

सतत दोन वर्षे अश्य रीतीने विचार करून नरपड येथे ता. ३ एप्रिल १९१० रोजी श्री. बाळा केशव राऊत यांच्या घरी पहिली सभा झाली. मुंबईचे श्री. काशीनाथ वालजी राऊत हे त्या सभेचे अध्यक्ष होते. यासभेस गांवागांवचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्वांच्या विचाराने 'सोमवंशी पाठारे क्षत्रिय चौकळशी ज्ञाती संघ' या नावाची एक मध्यवर्ती संस्था स्थापन करण्यात आली.