Trust Community संघाची उद्धीष्टे व घटना

संघाची घटना:

कोणत्याही संस्थेचे उद्देश, सभासदत्व, व्यवस्थापन कार्यपद्धती कशी असावी इत्यादी संबंधी करण्यात आलेल नियम लेखी स्वरूपात प्रसिद्ध् करण्याची आवश्यकताही असते. आपल्या संघाच्या संस्थापकांनी व व्यवस्थापकांनी या गरजांची दाखल कटाक्षाने घेतली आहे. हे निदर्शनास येते. संघाची ज्यावेळी स्थापना झाली त्यावेळी शुचिता व न्यायदान हे उद्देश त्यांच्या डोळ्यापुढे होते आणि अशा उद्देशांच्या पूर्ततेसाठी १९१० साली झालेल्या संघाच्या पहिल्या सभेत चौदा कलमाची एक नियमावली प्रसिद्ध केली आणि स्वीकृत कार्ये पार पाडीत असताना या नियमाचे काटेकोरपणे पालन केले जात असे. नियम मोडणारास नियमात नमूद केल्याप्रमाणे 'शिक्षा' ही केली जात असे. या नियमानुसार न्यायदानासाठी एक लवाद मंडळ ही नेमण्यात आले होते. परंतु या काळातील संघाच्या संघटनेची संकल्पना मात्र अस्पष्ट स्वरूपात होती.

संघाच्या सभेत हजर असलेल्या मंडळी कडून ग्रामनिहाय पंच नेमून दिले जात असत. त्यानंतर अध्यक्ष निवडीसंबंधी कोणीतरी पंच सूचना आणत असे व दुसरा पंच अनुमोदन देत असे. तसेच याच पद्धतीने उपाध्यक्षाचीही निवड होत असे. अध्यक्ष व उपाध्यक्ष स्थानापन्न झाल्यावर अध्यक्ष उत्तम लिखाण करणाऱ्या पंचास सभेपुरते चिटणीस म्हणून नेमत असे. अध्यक्ष व उपाध्यक्ष स्थानापन्न झाल्यावर सभेपुढे येणाऱ्या तक्रारीचा न्यायनिवाडा होत असे. संघाच्या दुसऱ्या कालखंडातही याच पद्धतीचा अवलंब केला जात असे, असे निदर्शनास येते. मात्र १९३७ साली संघाचा पुनश्च पुनरूद्धार झाल्यानंतर दि. १२-१२-१९३७ रोजी झालेल्या सभेत सुधारीत नियम मंजूर करून दि. ८ मे १९३८ रोजी तत्कालिन अध्यक्ष कै. पांडुरंग काशिनाथ राऊत व चिटणीस कै. अरविंद हरी राऊत व कै. लक्ष्मण माधव राऊत यांनी प्रसिद्ध केले. या प्रकाशनास जरी नियम असे संबोधण्यात आले होते, तरी प्रत्यक्षात ती संघाची पद्धतशीरपणे लिहिण्यात आलेली पहिली घटना आहे.

घटनेत आवश्यक असलेल्या सर्व बाबींची यथायोग्य दखल घेतल्याचे या नियमावलीत निदर्शनाय येते. यथावकाश संघाच्या कार्यात वाढ झाल्यानंतर या नियमांत घटनेची फेरबदल करण्याची आवश्यकता उत्पन्न झाल्यामुळे संघाच्या दि. २५-१२-१९४३ रोजी उमरोळी येथे कै डॉ. म. ब. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सतराव्या अधिवेशनात कै डॉ. म.ब.राऊत, कै. लक्ष्मण गोविंद राऊत, कै. ल.मा. राऊत, कै. का.मा. राऊत् व कै. अ.ह. राऊत यांची घटना दुरूस्ती समिती म्हणून नेमणूक झाली या समितीने तयार केलेली सुधारीत आवृत्ती संघाचे तत्कालीन चिटणीस कै. चिंतामण रावजी राऊत यांनी १५-०२-१९४७ रोजी प्रसिद्ध केली.

नियमात बदल होणे हे जीवंतपणाचे लक्षण असून संस्थेच्या नियमातील बदल हे आपल्या प्रगतीचे टप्पे आहेत असे मानले पाहिजे, पुढे संघाच्या कार्याच्या व्याप अधिकाअधिक वाढल्याने वरील नियम व घटना यात सुधारणा करण्याची पुन्हा आवश्यकता भासल्याने दि. १३-५-१९७९ रोजी झालेल्या व्यवस्थापक मंडळाच्या सभेने मागील घटनेचे दुरूस्तीसह पुनर्लेखन करण्यासाठी सभासदांची समिती नियुक्त कै. अ‍ॅड लक्ष्मण पांडुरंग पाटील, श्री. रामचंद्र बाळकृष्ण पाटील, श्री. लीलाधर त्र्यंबक चौधरी, समितीने तयार केलेली पुनर्लिखित घटनेची आवृत्ती संघाच्या दि. ०१-०२-१९८१ रोजी सालवड येथे संपन्न झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेने मंजूर केल्यावर समितीचे अध्यक्ष कै. अरविंद हरि राऊत संघाचे मुख्य चिटणीस श्री. अनंत दामोदर राऊत यांनी दि. २८-८-१९८३ रोजी प्रसिद्ध केली, याही घटनेत यथावकाश करण्यात आलेली दुरूस्ती दि. २२-१२-१९९१ च्या विशेष सर्वसाधारण्ण सभेत मंजूर केली ही दुरूस्ती अंतर्भूत केलेली संघाची घटना परिशिष्ट क्र. ३ मध्ये दिलेली आहे. दि. २०-१०-२००२ रोजी झालेल्या व्यवस्थापक मंडळाच्या सभेने वरील घटनेतील तरतुदित सुधारणा करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या प्रस्तावास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिल्यानंतर अशा दुरूस्तीचा समावेश घटनेत केला जाईल.

संघाने धर्मदाय आयुक्त(मुंबई) यांच्याकडे नोदविलेा न्यासविलेख (ट्रस्टडीड)

संस्थेच्या दि. ३१-१२-१९४४ रोजी वरोर येथे झालेल्या सर्वसाधारण सभेने संघाकडे असलेल्या निधीपैकी रू. १०,०००/- ची रक्कम निराळी काढून त्या रकमेचा एक निराळा ट्रस्टफंड करून त्याच्या व्यवस्थेकरिता खालील पाच सभासदांची एक ट्रस्ट कमिटी (विश्वस्त समिती) नेमण्यात आली त्यांची नावे येणे प्रमाणे.

  • कै. डॉ. मधुकर बळवंतराव राऊत्, एम्.बी.पी.एस्-दादर
  • कै. श्री. जनार्दन पांडुरंग राऊत, के माहीम
  • कै. श्री. पांडुरंग रामचंद्र राऊत, नरपड
  • कै. श्री. चिंतामण माधव राऊत्, उमरोळी
  • कै. श्री. काशिनाथ माधव राऊत, चिंचणी.

या निर्णयाला अनुसरून तयार करण्यात आलेले ट्रस्टडीड (न्यायविलेख) दि. २६-०४-१९४६ रोजी सबरजिस्ट्रार (उपनिबंधक) डहाणू यांच्या कार्यालयात नोंदविण्यात आला आहे. यथावकाश मुंबई पब्लिक ट्रस्ट ॲक्ट १९५० अस्तित्वात आल्यानंतर या ट्रस्टफंड आधारे आपली संस्था असिस्टंट चॅरिटि कमिशनर बृह्न्मुंबई विभाग, मुंबई यांचे कार्यालयात नोंदणी क्रं. अे/३९५ अन्वये दि. १८ सप्टेंबर १९५२ रोजी नोंदविण्यात आली आहे. वरील ट्रस्टडीड व नोंदणीचा दाखला यांच्या झेरॉक्स प्रती परिशिष्ट क्र. ४ म्हणून जोडण्यात आल्या आहेत.