Trust Community तेथे कर आमुचे जुळती

जगातील कुठल्याही प्रगत देशाचा विचार केला, तर त्या देशाच्या प्रगतीमध्ये ठळकपणे दिसून येते ती त्या देशातील नागरिकांनी केलेली क्रांती. या क्रांतीसाठी कारणीभूत ठरली ती त्या देशातील बांधवांची बौद्धिक प्रगती आणि तिला जोड मिळाली ती देशबांधवांच्या उच्च दर्जाच्या वैचारिक पातळीची.अशा सक्षम देशांनीे बऱ्याच देशांना आपल्या पंखाखाली घेतले, दोन्ही अर्थांनी, काहींवर अतिक्रमण करून तर काहींना आधार देऊन.

आपल्या भारत देशाचा विचार केला तर स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या देशात अनेक समाजधुरीण होऊन गेले, ज्यांनी त्यांच्या काळात समाजातील वेग-वेगळ्या विचारांच्या लोकांना एकत्रीत करून व त्यांची योग्यता जाणुन त्या सर्व मंडळींकडून दर्जेदार ऐतिहासिक कामगिरी करून घेतली. आपल्या देशाच्या इतिहासात अशा एकाहुन एक सरस अनेक महारथिंची नोंद दिसून येते, ज्यांचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे भारताच्या प्रगतीत वाटा आहे. याच काळात आपल्या समाजानेही हळू हळू कात टाकायला सुरुवात केली. वेगवेगळ्या गावात विखुरलेल्या आपल्या सो पा क्ष समाजबांधवांची एकत्र मोट बांधून, त्यांच्यात आपुलकी निर्माण करून, एकमेकांच्या साहाय्याने एकमेकांसाठी प्रगतीची अनेक दारे खुली केली. इतर समाजाच्या तुलनेत आपल्या समाजालाही आदराचे स्थान निर्माण करून दिले. अश्या आपल्या विखुरलेल्या बांधवांना एका छत्र-छाये खाली आणुन त्यांना सर्व बाबतीत सक्षम बनविण्याचे काम ज्यांनी केले आहे, त्या सर्व समाज धुरिणांचा उल्लेख जर इथे झाला नाही, तर तो कपाळकरंटेपणा ठरेल. त्यांनी केलेले कार्य हे अनमोल आहे व समाज त्यांचा आजन्म कृतज्ञ राहिल. दळण-वळणांची तुरळक साधने, तुटपुंजा पैसा तसेच आपल्या व्यस्त वेळातुनही समाज कल्याण हे एकमेव धेय बाळगुन त्यांनी केलेले कार्य हे निश्चितच कौतुकास्पद आहे.

यातील काही श्रेष्ठ मंडळी काळाच्या पडद्याआड गेली आहेत, त्यांच्या कामाचा उल्लेख करून त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्याचा प्रामाणिक प्रयत्न येथे केलेला आहे. तसेच, हयात असलेल्या जेष्ठ मंडळींच्या कार्यातुन तरूणांनी बोध घ्यावा व त्यांच्या अनुभवातुन पुढील वाटचालीची रूप-रेषा आखावी, हीच अपेक्षा आहे. यानिमित्ताने सर्व जेष्ठांचे आशिर्वाद या उपक्रमाला लाभावेत हीच प्रभुचरणी प्रार्थना.

टिप: ह्या नोंदी मधे काही व्यक्ती अनावधानाने राहुन गेल्या असल्यास कृपया आमच्या निदर्शनास आणावे ही विनंती. योग्य व्यक्ती व त्यांची माहिती ह्या सत्रात निश्चितच समाविष्ट करता येतील.