Trust Community संघाचा पहिला कालखंड (१९१० ते १९१४)

संघस्थापनेचा प्राथमिक उद्देश: शुचिता व न्यायदान

संघाने यावेळी हाती घेतलेल्या कार्यावरून समाजशुचिता व न्यायदान हे संघाचे मुख्य उद्देश ठरले असावेत असे अनुमान काढता येते. तो काळ असा होता की, प्रत्येक समाज आपणास श्रेष्ठ समजे. ही श्रेष्ठता त्याच्या आचारावर-वागणूकीवर असे. विशेषत: ब्राम्हणी अनुकरण करण्याकडे कल असे. त्यांत आपला समाज तर मूळचाच कर्मठ सोवळा. त्यामुळे खेड्यापाड्यात इतरांच्या सहवासाने अगर परिस्थितीने या सोवळेपणाला बाध आणणारे कृत्य घडत असेल म्हणून समाजांत हाकाटी चालली असावी. त्या त्या गावांच्या पंचांनी या गोष्टींकडे लक्ष वेधले असेल म्हणून शुचितत्वाकडे संघाने प्रथम लक्ष दिले. समाजीतील सामजिक वा इतर कोणत्याहि फिर्यादी कोर्टात जाण्याने जातीची बेअब्रू होते, आपल्या क्षत्रियत्वाला बाधा येत आपल्या लोकांचा नाहक पैसा व वेळ खर्च होतेा असे संघाला वाटले म्हणून न्यायादानाचे कामहि संघाने पत्करले. यासाठी मासे मारू नये, ब्राम्हणाशिवाय इतर जातीकडे खाऊपिऊ नये, सार्वजनिक किंवा निषिद्ध ठिकाणी खानपान करूं नये, दारूचे अगर ताडीचे दुकान ठेवू नये, कोंबड्या पाळू नये, जीतींतील भांडणे कोर्टात नेऊं नयेत वगैरे १४ नियम संघाने पहिल्या सभेंत पास केले व हे नियमक मोडणाऱ्यांस काय शिक्षा करावी हेहि त्या नियमांतच होते. हे नियम म्हणजे एक 'स्मृति' होती. न्याय देतांना प्रत्येक नियमाच्या आधाराने विचार होत असे.

उददे्शपूर्तीसाठी नियम व त्यांची अंमलबावणी:

प्रथम प्रथम या नियमांची अमंलबजावणी फार कडकपणे झालेली दिसते. शुचिकतेबद्दल जे नियम होते त्यांच्या समाजाच्या आचरणावर फार अनूकूल परिणाम झाला. न्यायदानाचे कामहि बरे चाले. स्त्री पतिगृही न राहणे, तिचे सासरी हाल होणे, एकदा केलेली सोयरिक मोडणे, विवाहित अगर विधवा स्त्रींचे दागिने न देणे, जमिनीबद्दलचे तंटे, कोर्टात नेऊन खर्चात पाडले म्हणून तक्रार करणे, वगैरे अनेक फिर्यादी संघाने घेतल्या व त्याबद्दल न्याय दिला. जो दोषी ठरे त्यास नियमात सांगितलेला दंड होई. दिलेला न्याय कुणी मानला नाही व दंडहि भरला नाही तर त्याबद्दल त्या गावांस विचारले जाई. गांवकऱ्यांनी लक्ष घातले नाही तर गांवासहि सामुदायिक दंड होत असे. दंड न दिल्यास शेवटची शिक्षा म्हणजे बहिष्कार होत असे. कित्येक गरीब कुटुंबांना या न्यायदानाचा चांगला फायदा झाला. तसेच काही नियम पाळणे लोकांना जडही जाऊं लागले. संघाच्या पुढील दोनतीन सभांत काही नियमांत ठरावाने दुरूस्ती केलेली आढळते. उदा. जंगलात सुक्या मासळीचे गाडीभाडे करण्यास हरकत नाही, नोकराकडूनन दारूचे अगर ताडीचे दुकान चालविणे चालेल वगैरे. कोंबड्या न पाळणाऱ्यावर मात्र संघाचा मोठा कटाक्ष होता. कां तो न कळे! भूतदया की फाजील शुचिता ! कोंबडी पाळणाऱ्यास नियम नं. २ प्रमाणे ५ रू. दंड होता व पंचानी तपास केला नाही तर त्यांस १० रू. दंड होता. संघाच्या तिसऱ्या सभेत या नियमाच्या अमंलबजावणीसाठी कै. भास्कर कृष्णा पाटील अल्याळीकर यांस 'फिरणी स्पेशल' (ह्या त्यावेळच्या कागदपत्रांतील शब्द) नेमले होते. त्यांनी "भलत्या वेळी भलत्या गांवी जाऊन तपास करावा. ज्या गावांत मुद्देमाल मिळेल त्या गावचे ज्ञातीपंचाना दाखल करून त्याजवळून तसे पत्र घेऊन अध्यक्षांस कळवावे" अशी त्यास आज्ञा होती.

ज्ञातिफंडाची निर्मिती व व्यवस्थापन:

पंचाळी येथे झालेल्या तिसऱ्या सभेत दंडाची रक्कम आणि कुणी वर्गणी देईल ती एकत्र करून फंड जमवावा व पुढे ज्ञातीस जरूर लागेल त्याप्रमाणे त्याचा विनियोग करावा असा ठराव झाला. याच ठरावाने एकंदर दंड ६१ रू. व वर्गणी ८ रू. मिळून ६९ रू. माहीम पोस्टांत कै. त्र्यंबक पांडूरंग राऊत (के. माहीम), के भाऊ देवजी पाटील (केळवे), कै. गणू जैतू ठाकूर (के. माहीम), कै. गोविंद लक्ष्मण पाटील (पोफरण), व कै. हासू बापू राऊत (उमरोळी) यांच्या नावे ठेवण्याचे ठरले होते.

नियमाविरूद्ध बंड:

संघाचे सर्व नियम पाळावयाचे नाहीत असे ठरविल्यामुळे सालवड गावास बहिष्कृत ठेवले होते. पुढे काही मंडळी विचार करून संघास मिळाली आणि बहिष्कार उठला. नंतर सालवड येथे झालेल्या चौथ्या सभेत कै. दाजी त्रिंबक पाटील सालवडकर यांने सडेतोड शब्दांत विरोध केला. त्यांनी कोंबड्या पाळण्यापासून शेतकरी वर्गाचे काय फायदे होतात ते सांगितले व संघाच्या न्याय पद्धतीबद्दलही टीका केली. परंतु त्यांनी आपला हेका न सोडल्यामुळे सभेने त्यास बहिष्कृत ठेवले. त्यांनीहि समाजावर बहिष्कार घातला. पुढे हळूहळू सभाहि बंद झाल्या. बहिष्काराचा काळ गेला परंतु तारीख४-१-१९५२ रोजी त्यांचा मृत्यु होईपर्यंत सुमारे ४० वर्षे कै. दाजी त्रिंबक पाटील हे समाजातील कुणाहि व्यक्तिकडे वा स्वत:च्या बायकोच्या किंवा मुलीच्या हातचे जेवत नसत. किती कठोर प्रतिज्ञा!

संघावर आलेले संकट:

संघाची पाचवी सभा १९१४ साली वरोर येथे झाली. ही सभा राजकीय स्वरूपाची आहे असे कुणीतरी कुचाळखोराने सरकारांत कळविले. सरकारकडून संस्थेच्या कागदपत्राची तपासणी झाली व समाजसुधारक हेच ह्या संस्थेचे कार्य आहे असा अभिप्राय मिळाला, तेव्हा उपद्व्यापी लोकांची तोंडे आपोआप बंद झाली.

त्याकाळची सभा पद्धति:

त्यावेळच्या सभा कशा चालत हे उल्लेखनीय आहे. प्रथम हजर असलेल्या मंडळीतून गांवावर पंच नेमून दिले जात. मोठ्या गांवास ३ ते ५ पर्यंत पंच असतं. नंतर अध्यक्षाबद्दल कुणीतरी पंच सुचना आणी व तीस दुसरा पंच अनुमोदन अध्यक्ष चांगले लिहून घेणारास सभेपूर्ती चिटणीस नेमीत असे. चिटणीसाने सभेत होणात्या लहान सहान गोष्टी लिहून ठेवायच्या होत्या. नंतर वर्षभर सर्व काम अध्यक्षच करी. अध्यक्ष व उपाध्यक्ष स्थानापन्न झाल्यावर पुढे योणाऱ्या तक्रारींचा न्याय होत असे.

संघाचे कार्य बंद झाले:

काळ बदलत होता. पहिल्या महायुद्धास सुरूवात झाली. संस्थेचे कडक नियम पाळणे लोकांना अशक्य होत होते. न्याय मिळे त्यानेहि असंतोष पसरे. एकाला न्याय दिला, तर दुसरा रागावे व तो आपल्या सग्यासोसऱ्यांना आपल्या बाजूचे करी. अशा तऱ्हेने गट निर्माण झाले व पाच वर्षे अखंडपणे चाललेले संस्थचे कार्य बंद झाले.

संस्थचे कार्य आजच्या काळांत जरी अव्यवहार्य वाटते, तरी त्या काळांत समाजाची श्रेष्ठता त्या गोष्टींवर अवलंबून होती. शिवाय एक मध्यवर्ती संघटना झाली. समाज एकतेची भावना निर्माण झाली. समाज जवळ आणला. हे संस्थेचे मोठे कार्य आहे. सध्या दुसऱ्या व तिसऱ्या सभेचे हस्तलिखित अहवाल व कै. गोविंदा पाटील यांची काही पत्रे त्याकाळात उपलब्ध होती. यावरून संस्थेचे दप्तर सुव्यस्थित असावे असे वाटते. परंत ते सांभाळण्याची कामगिरी संघाच्या दुसऱ्या कालखंडांत झालेली दिसत नाही.