Trust Community तेथे कर आमुचे जुळती

श्री हरिश्चंद्र माधव पाटील

श्री हरिश्चंद्र माधव पाटील, हे वरोर गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेत शिक्षक म्हणून त्यांनी नोकरी केली. फक्त स्वतःपुरता विचार न करता, त्यांनी या काळात गावातील आणि समाजातील अनेकांना मुंबईला नोकरी करण्यास प्रवृत्त केले. ज्यांची राहण्याची, जेवण खाण्याची सोय नव्हती, त्यांना स्वतः आसरा दिला. आपल्या तिनही मुलांना योग्य शिक्षण देऊन त्यांना मार्गी लावले. पीडितांच्या प्रश्नांना सरकार दरबारी हिरीरीने मांडून सरकारला त्यांची दखल घेण्यास भाग पाडणारे शिक्षक आमदार श्री कपिल पाटील हे त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र. निवृत्तीनंतर ते गावी येऊन समाजप्रबोधन आणि शेतीवाडीत रमले आहेत. आता वयोमानानुसार त्यांनी समाज कार्य बंद केले असले तरी, आपल्या सामाजिक कारकिर्दीत संघाच्या सहाय्यक चिटणीस, मुख्य चिटणीस, खजिनदार, उपाध्यक्ष, अध्यक्ष, विश्वस्त अशा सर्वच पदांवर काम करून त्या पदांना न्याय दिला आहे.

सतरा वर्षे त्यांनी वृत्तपत्रिका संपादक म्हणून प्रभावीपणे काम सांभाळले आहे. त्यांच्या या कामाची पोहोचपावती म्हणून समाजाने त्यांना १९८९ साली पालघर येथील अधिवेशनात अध्यक्षपदाचा बहुमान दिला. समाजस्थापनेपासून वरोर गावाची विश्वस्तपदाची रिक्त झोळी, त्यांच्या विश्वस्त होण्याने भरली आणि वरोर गावातून समाजाचे पहिले विश्वस्त होण्याचा मान त्यांना मिळाला. १९९२ ते २००३ पर्यंत त्यांनी विश्वस्तपदाचे काम पाहिले. या सर्व प्रवासात सहचारिणी सौ. वासंतीताईंची साथ त्यांना लाभली. स्पष्टवक्तेपणा आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती हे त्यांचे विशिष्ट गुण आहेत. तरुण पिढीसमोर एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहेत. वयाने ऐंशीच्या घरात असतानाही वरोर येथे २०१४ साली झालेल्या ८७ व्या अधिवेशनाच्या तयारीत तरुणाला लाजवेल अशा उत्साहाने त्यांनी भाग घेतला होता आणि मार्गदर्शन केले होते. त्यांना उत्तम आयुरारोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.