Culture & Tradition Culture & Tradition घरजत्रा  (महिना : चैत्र)

GharJatra

घरात भरणारी जत्रा म्हणजे 'घरजत्रा' असा याचा शब्दशः अर्थ होतो; सोमवंशी पाठारे क्षत्रिय (चौकळशी) समाजात 'घरजत्रा' हा खूप महत्त्वाचा सण समजला जातो. पूर्वापार चालत आलेल्या रीतिनुसार प्रत्येक गावी, प्रत्येक घरात, प्रत्येकाच्या कुलदैवतानुसार आणि त्याच्या तिथिनुसार घरजत्रा केली जाते.

वाडवळ समाजात घरजत्रेच्या दिवशी आपल्या कुलदेवतेला कोबड्याचा बळी देण्याचाप्रकार पुर्वापार चालत आलेला दिसून येतो. प्रत्येक घरात, प्रत्येक कुटुंबात पुजेसाठी एकत्र जमणाऱ्या घरातील मंडळींच्या मुळेसुद्धा कदाचित या सणाला 'घरजत्रा' हे नांव प्रचलित झाले असावे असा अंदाज आहे. वाडवळ समाजात एकविरा, वज्रेश्वरी, शीतला देवी, महालक्ष्मी, महिकावती या कुलदेवतांची घरजत्रेच्या दिवशी पूजा केली जाते. तसेच कांही गावात श्रीरामाची कुलदैवत म्हणून पूजा करतात.

आपल्या कुलदैवतानुसार ज्या तिथीला घरजत्रेची पुजा करावयाची असेल तर त्या दिवशी पाटावर देवीची पूजा केली जाते. या दिवशी संपूर्ण घर स्वच्छ करून ज्या ठिकाणी पाट ठेवायचा असेल त्या जागेवर रांगोळी काढून पाट ठेवला जातो. प्रथम विघ्नहर्त्या गणपतीची पूजा करून नंतर पाटावर ठेवलेल्या कुलदैवताच्या फोटोला हार व वेणी घालून विधिवत पूजा मांडली जाते. (नवीन) आंब्याची घुळ (एकाच फांदीला पांच किंवा जास्त असलेले एकत्र आंबे) देवीसमोर बाजूला उभे ठेवून त्यावर फुले आणि हळदी कुंकू वाहतात. पुजेला नागचाफा आणि झेंडूची फुले वापरतात. बाजूला सुकडी नारळ स्वच्छ धुवून पुजेला ठेवतात. नंतर सुवासिनी देवीची खणानारळाने ओटी भरतात. मागच्यावर्षी ठेवलेल्या सुकडीही पूजा केली जाते. तसेच कुटुंबातील सर्वजण देवीची पूजा करून नंतर एकत्र आरती करतात. आरतीनंतर मागील वर्षाची सुकडी (नारळ) फोडून त्यातील सुके खोबरे, नवीन आंब्याच्या फोडी, आणि देवीजवळ फोडलेला ओला नारळ यांचा एकत्र केलेला प्रसाद घरात आणि शेजारी सर्वांना वाटतात. गोड प्रसाद म्हणून रवळी करतात.

पूर्वापार चालत आलेल्या बळीच्या परंपरेनुसार लाल कोंबड्याला आंघोळ घालून त्याला बळी देण्यापूर्वी पाणी पाजले जाते व शेंदूर फासून त्याच्या रक्ताची धार पळसाच्या पानावर टाकलेल्या तांदूळ आणि कुंकवावर टाकून कुटूंबातील प्रमुख व्यक्तीच्या हातून त्याचा बळी दिला जातो (हि प्रथा योग्य वाटत नाही). नंतर त्याची भाजी शिजवून प्रसाद म्हणून वाटली जाते. मात्र कलेजी आणि तिठा यांचा प्रसाद देवीला दाखवून झाल्यावर तो प्रसाद घराबाहेर ठेवला जातो.

कोंबड्याच्या भाजीमध्ये आंबा टाकून आजच्या दिवसापासून नवीन आंबा खायला सुरुवात केली जाते. काही ठिकाणी बळी म्हणून फक्त नारळच देवीजवळ फोडतात व त्याचा आंबा आणि सुकडीसोबत प्रसाद वाटतात. पूर्वी घरजत्रेला देवीची मूर्ती म्हणून लाकडी बाहुलींची पूजा केली जात असे. आज देवीचा फोटो वापरतात. घरात नवीन लग्न झालेल्या जोडप्यांची बाशिंगे आणि हाताची कांकण (हळदी गाठे) जतन करून ठेवून घरजत्रेच्या दिवशी नवपरिणीत जोडप्याला देवीसमोर पूजेला बसवून त्यांच्या हस्ते देवीची पूजा केली जाते व त्यांच्या बाशिंग कांकणाची पूजा केली जाते. दुसऱ्या दिवशी त्यांचं विसर्जन केले जाते.

या दिवशी जो नवीन सुकडी नारळ पूजेला ठेवला जातो तो नारळ देव्हाऱ्यात ठेवून त्याला हळदीकुंकू वाहून त्याची वर्षभर पूजा केली जाते. यामागे आपल्या घरावर देवीची कृपा सदैव रहावी हा उद्देश असतो. म्हणून कोणत्याही मंगल कार्यक्रमात गणपती बरोबर आपल्या कुलदैवतेचे नामस्मरण केले जाते व पूजाही केली जाते.

प्रत्येक गावात ग्रामदेवता जरी वेगवेगळी असली तरी वाडवळ समाजातील बहुतांश कुटुंबातील कुलदैवतं ही एकविरा, वज्रेश्वरी, शीतला देवी, महालक्ष्मी आणि महिकावती अशीच आहेत. एका मूळ गावातून जे कुटुंब दुसऱ्या गावी स्थलांतरीत झाले तरी त्याचे कुलदैवत हे मूळ गावातीलच राहते. ते गावानुसार बदलत नाही. घर जत्रेची पूजा चैत्र महिन्यातील अष्टमी, पौर्णिमा, आणि अमावास्या या तिथींना करतात.

श्री कुलदेवताय नमः