Culture & Tradition Culture & Tradition गुढी पाडवा  (महिना : चैत्र)

Gudhi-Padwa

भारतीय सौर (मराठी) वर्षातील पहिल्या चैत्र महिन्यातील शुद्ध प्रतिपदेला "गुढी पाडवा" म्हटले जाते .हिन्दु वर्षाचा हा पहिला सण. वनवासाला गेलेल्या श्रीरामाने अहंकारी आणि नितिभ्रष्ट रावणाचा पराभव करून अयोध्येत पुन्हा पदार्पण केले तो हा दिवस.

ह्या आनंदाप्रीत्यर्थ अयोध्येतील नगरजनांनी गुढ्या उभारून आणि सर्वत्र रांगोळी काढुन हा दिवस साजरा केला. तेव्हापासुन भारतवर्षात हा दिवस सण म्हणुन साजरा करतात. आपला वाडवळ समाजही हा दिवस सण म्हणुन आपल्या पद्धतीने साजरा करतो.ह्या दिवशी प्रभातकाळी घरची गृहलक्ष्मी सालंकृत होवून घरासमोर सडासंमार्जन करून रांगोळ्या काढ़ते.घराच्या प्रवेशद्वारासमोर पाटावर श्रीफलासहित मंगलकलश ठेवून श्रीगणेशाला पुजेद्व्वारे आवाहन करून सर्व देवतानाही नमस्कार करून घरातील प्रमुख कर्त्या पुरुषाच्या हस्ते एका मोठ्या काठिला रेशमीवस्त्रासोबत कडुनिंबाच्या कोवळ्या पानाची डहाळे, फुलांचा हार बांधुन त्यावर छोटा तांब्या (गडवा) उपडा ठेवून तो उंचावर उभारला जातो.

ह्या दिवशी पक्वान्न म्हणुन पुरणाची पोळी, श्रीखंड असे गोड पदार्थ केले जातात. त्याच्या गोडपणाचा शरीराला त्रास होवू नये म्हणून कदाचित ह्या दिवसाचा प्रसाद म्हणुन कडुनिंबाचा कोवळा (जो कडूच )असतो खाल्ला जातो. साधारणत: दिवसाचा मध्यान्ह सरल्यावर उभारलेला गुढी उतरवली जातो. हिंदुच्या साडेतीन मुहुर्तापैकी पहिला आणि पुर्ण महूर्त असतो म्हणून ह्या दिवशी आपल्याकड़े व्रतबंध( मुंज ) नवीनबालकाचा नामकरण सोहळा (बारसं), साखरपुडा, वास्तुमुहूर्त, विवाह विधि असे उपक्रम हाती घेतले जातात कारण हा संपूर्ण दिवस शुभ असल्याने ह्या दिवशी महूर्त बघण्याची गरज नसते.